पवित्र निरा स्नानानंतर
सातारा जिल्ह्यात माऊलींचे
भक्तिमय वातावरणात आगमन
हरिनामाच्या गजराने श्री क्षेत्र लोणंद दुमदुमले
पुणे जिल्ह्यातून साताऱ्यात प्रवेश
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पवित्र पादुकांचे निरा स्नान
मान्यवरांकडून स्वागत आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
संतोष शिराळे | लोणंद/सातारा
"ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पालखीचे बुधवारी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आगमन झाले. निरा नदीतील पारंपरिक व अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या माऊलींच्या पादुकांच्या निरा स्नान सोहळ्यानंतर पाडेगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महासागर उसळला. लाखो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी या अलौकिक सोहळ्याचे दर्शन घेत आपल्या डोळ्यांचे पारणे फेडले.
पहाटेपासूनच निरा नदीच्या तीरावर वारकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. हरिनामाचा अखंड गजर, अभंग-भजन, टाळ-मृदुंगाचा नाद आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. परंपरेनुसार माऊलींच्या पवित्र पादुकांना निरा नदीत शाही स्नान घालण्यात आले. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक नदीकाठी जमले होते. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर अनेकांच्या ओठांवर विठ्ठलनाम होते.
निरा स्नानानंतर पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच पाडेगाव येथे जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले तसेच वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्प अर्पण करून माऊलींचे भावपूर्ण स्वागत केले. पोलीस बँड पथकाच्या मंगलमय धूनांनी स्वागत सोहळ्याला अधिकच देखणे स्वरूप प्राप्त झाले.
लोणंद परिसरातही पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी तुळशीहार अर्पण करून तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती भेट देत माऊलींच्या पालखीला अभिवादन केले. पालखी मार्गावर फुलांची उधळण, रांगोळ्या, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, निवारा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी पालखीचे लोणंद येथील पालखी तळावर आगमन झाल्यानंतर संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक समाज आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. आरतीच्या वेळी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल"च्या जयघोषाने पालखी तळ दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात उपस्थित प्रत्येक वारकरी भक्तीरसात तल्लीन झाला.
समाज आरतीनंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांच्या दर्शनास प्रारंभ झाला. दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारो वारकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला. दर्शनावेळी अनेक भाविक भावविवश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पालखी तळावर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, निवारा आणि सुरक्षा यांची व्यापक व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती. संपूर्ण परिसरात पोलीस आणि स्वयंसेवकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील आगमन, निरा स्नान, पाडेगाव येथील स्वागत आणि लोणंद पालखी तळावरील समाज आरती व पादुकांचे दर्शन या सर्व धार्मिक परंपरांनी भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला दिला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोणंद नगरी अक्षरशः विठ्ठलमय झाली.
"ज्ञानोबा माऊली... तुकाराम!"
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!"
या अखंड गजराने लोणंद आणि सातारा जिल्हा भक्तीरसात न्हाऊन निघाला.









0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!