विजेचा धक्का लागून
एकाच कुटुंबातील
चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
फलटण तालुक्यातील खामगाव हादरले
फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील खामगाव येथे आज पहाटे झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०), सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि आरती सतीश शिंदे (वय २४) यांचा समावेश आहे. सर्वजण साखरवाडी, खामगाव येथील रहिवासी असून पारधी समाजातील आहेत.
आज (दि. ८ जुलै) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास सचिन सतीश शिंदे (वय २६, रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे घरावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीजवळील सपोर्टसाठी बांधलेल्या लोखंडी बाइंडिंग वायरच्या संपर्कात आले. सदर वायर एमएसईबीच्या विद्युत वाहिनीला घासल्याने त्यामध्ये वीजप्रवाह आला होता. त्या लोखंडी तारेचा शॉक लागल्याने सचिन शिंदे अडकले. त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या त्यांचे वडील सतीश उर्फ पिसुराड्या किसन शिंदे (वय ४५) व आई गंगू सतीश शिंदे (वय ४०) यांनाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, फिर्यादी शीतल सचिन शिंदे यांनी काठीच्या साहाय्याने लोखंडी तार दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी सचिन यांची बहीण आरती सतीश शिंदे (वय २४) ही घटनास्थळी आली. परिस्थितीची कल्पना नसल्याने तिने लोखंडी तार हाताने पकडताच तिलाही विजेचा तीव्र धक्का बसला. शीतल शिंदे यांनी काठीच्या साहाय्याने सर्वांना तारांपासून दूर केले, मात्र तोपर्यंत चौघेही बेशुद्ध होऊन खाली पडले होते. त्यामध्ये वडील, आई, मुलगा आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादी शीतल सचिन शिंदे यांनी दिलेल्या खबरवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७५/२०२६, ७६/२०२६, ७७/२०२६ व ७८/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, फलटण शहर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे या करीत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!