सातारा जिल्ह्यात
पावसाचा जोर कायम
धरणांमध्ये पाण्याची वाढती आवक
गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ४१.३९ टीएमसीने कमी
संतोष शिराळे | सातारा
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे डोंगराळ भाग अक्षरशः जलमय झाला असून महाबळेश्वर, कोयना, नवजा आणि जावळी परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असला तरी गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा अद्याप तब्बल ४१.३९ टीएमसीने कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम अशा १६ धरणांमध्ये सध्या ५२.६३ टीएमसी (३५.३५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, गतवर्षी याच दिवशी तो ९४.०२ टीएमसी (६३.१५ टक्के) इतका होता. हवामान विभागाने पुढील २४ तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने धरणांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा पूरनियंत्रण कक्षाच्या मंगळवार (७ जुलै) सकाळी ८ वाजेच्या अहवालानुसार, कोयना धरणात ३५.७० टीएमसी (३३.९३ टक्के) एकूण पाणीसाठा झाला असून, त्यापैकी ३०.५८ टीएमसी (३०.५४ टक्के) उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा आहे. धरणाची पाणीपातळी ६३६.०४१ मीटर (२०८६.०९ फूट) इतकी झाली असून धरणात ९३,०२० क्युसेक्स (सुमारे ८.०३ टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे. विशेष म्हणजे, अद्याप धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
कोयना धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी गतवर्षी ७ जुलै रोजी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६३.२६ टीएमसी होता, तर यंदा तो ३०.५८ टीएमसी आहे. म्हणजेच केवळ कोयना धरणातच गेल्या वर्षाच्या तुलनेत ३२.६८ टीएमसीने कमी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठा वाढत आहे. धोम धरणात ६.५९ टीएमसी (४८.८१ टक्के) पाणीसाठा असून धरणात १४,२४० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धोम-बाळकवाडी धरणात २.१७ टीएमसी (५३.१९ टक्के) पाणीसाठा असून ४,४९४ क्युसेक्स, कण्हेर धरणात ६.२९ टीएमसी (६२.२८ टक्के) पाणीसाठा असून १२,८४९ क्युसेक्स, उरमोडी धरणात ४.५० टीएमसी (४५.१८ टक्के) पाणीसाठा असून ७,९८२ क्युसेक्स, तर तारळी धरणात १.७३ टीएमसी (२९.५७ टक्के) पाणीसाठा असून ६,४१५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
गेल्या वर्षाशी तुलना करता धोम धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४.७८ टीएमसी इतकाच कायम आहे. धोम-बाळकवाडी धरणात गेल्या वर्षी १.७७ टीएमसी असलेला साठा यंदा २.०५ टीएमसी झाला आहे. मात्र, कण्हेर धरणातील साठा ६.८९ टीएमसीवरून ५.७९ टीएमसी, उरमोडी धरणातील साठा ६.७८ टीएमसीवरून ४.१९ टीएमसी, तर तारळी धरणातील साठा ५.०२ टीएमसीवरून १.७२ टीएमसी इतका खाली आला आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये मोरणा धरणात सर्वाधिक ७३.०९ टक्के, तर म्हैसवड धरणात ७१.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी, नेर, आंधळी, वांग, हटगेघर, म्हाऊ आणि इतर धरणांमध्येही सातत्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम अशा सर्व १६ धरणांमध्ये एकूण ६१.१६ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो एकूण क्षमतेच्या ३८.८३ टक्के आहे. उपयुक्त पाणीसाठा ५२.६३ टीएमसी (३५.३५ टक्के) इतका आहे. गतवर्षी याच दिवशी हा उपयुक्त साठा ९४.०२ टीएमसी (६३.१५ टक्के) होता. म्हणजेच यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये ४१.३९ टीएमसीने कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, कृष्णा-भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रांच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत महाबळेश्वरमध्ये ४०० मिमी, सोनाट येथे ३४७ मिमी, कोयना येथे ३१९ मिमी, नवजा येथे २७६ मिमी, सांडवली येथे ३७९ मिमी, धोम-बाळकवाडी येथे १८६ मिमी, कास येथे १७५ मिमी, मेढा येथे १३१ मिमी, धोम येथे १२० मिमी, उरमोडी येथे ११७ मिमी, बामणोली व रांजणी येथे प्रत्येकी ११२ मिमी, तर पारळी येथे १०७ मिमी पावसाची नोंद झाली.
सातारा वेधशाळेत गेल्या २४ तासांत ७०.३ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ९७ टक्के असून वातावरण ढगाळ व वादळी राहिले. तर महाबळेश्वर वेधशाळेत ४०३ मिमी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असून हंगामी पर्जन्यमान २१२०.४ मिमीवर पोहोचले आहे. तेथे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून धुके आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदी-नाले, ओढे, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणांमध्ये पाण्याची आवक आणखी वाढून पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!