व्हायरल कथित सुसाईड नोटीनंतर अखेर गुन्हा दाखल; फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण; जावलीतील व्यक्तीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हायरल कथित सुसाईड 

नोटीनंतर अखेर गुन्हा दाखल

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण 

जावलीतील व्यक्तीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण | प्रतिनिधी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याशी संबंधित कथित सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून धमकावल्याचा आरोप आणि न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याचा दावा या कथित नोटीत करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून संबंधित डॉक्टरांच्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर (वय २७, रा. फडतरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर क्रमांक ०२८०/२०२६ अंतर्गत २९ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३७ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ३(५), ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, २८ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राच्या संदर्भात काही व्यक्ती डॉक्टरांकडे आल्या होत्या. डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञांचे मत घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्ती पुन्हा रुग्णालयात आल्या. त्यावेळी प्रमाणपत्र देण्यावरून वाद झाल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख (रा. जावली, जि. सातारा) यांनी डॉक्टरांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला तसेच "तुला उद्या सकाळी समजेल तू कोणाशी बोलत आहेस," अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीनेही शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेपूर्वी सोशल मीडियावर संबंधित डॉक्टरांच्या नावाने एक कथित सुसाईड नोट आणि हातावर लिहिलेल्या मजकुराची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्या कथित नोटमध्ये फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून धमक्या मिळाल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारामुळे आरोग्य विभागासह फलटण परिसरात मोठी खळबळ उडाली होती

या प्रकरणामुळे काही वर्षांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि कामाच्या वातावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्हायरल कथित सुसाईड नोट समोर आल्यानंतर सुरुवातीला कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पोलिसांकडून दुजोरा मिळाला नव्हता. मात्र, आता संबंधित डॉक्टरांच्या फिर्यादीवरून अधिकृतपणे गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयमाला बाबाजी गजारे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments