मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त साताऱ्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर'

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त

साताऱ्यात छत्रपती शिवाजी

महाराज महसूल समाधान शिबिर

सातारा | प्रतिनिधी

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 22, 25 आणि 26 जुलै 2026 या तीन दिवसांपैकी एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी 26 जुलै 2026 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा तालुक्यातील लिंबखिंड येथील विठ्ठल मंगल कार्यालयात होणाऱ्या या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ आणि नागरिकांच्या महसुली विषयांशी संबंधित सेवांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये महिलांना शेतकरी म्हणून प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व हक्काच्या सनदा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहीम, सिंचित क्षेत्रातील निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेंतर्गत विशेष तरतुदी, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसायास सवलती तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याबाबतची माहिती व सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, महसूल विभागाच्या सेवा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांचा लाभही या शिबिरातून नागरिकांना मिळणार आहे.

उपविभागीय अधिकारी आशीष बारकूल आणि तहसीलदार (मेढा) प्रविण मुगदुल यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments