पिंपळीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दिलासा; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या तत्परतेने तुंबलेले गटार मोकळे

लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या

तत्परतेने तुंबलेले गटार मोकळे

उपसभापती गोरखबाबा महाडिक यांची प्रत्यक्ष घटनास्थळी भेट

पिंपळीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दिलासा 

संतोष शिराळे, सातारा : 

पिंपळी (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीसमोरील कच्च्या गटारात पावसाचे पाणी तुंबून विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांना होत असलेल्या गंभीर त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून तातडीने कार्यवाही करत तुंबलेले गटार मोकळे करण्यात आले.

गावडेवाडी ते महू या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यालगत सुमारे ६०० फूट लांबीचे कच्चे गटार आहे. मुसळधार पावसामुळे या गटारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने ते रस्त्यावर येत होते. परिणामी शाळा व अंगणवाडीत जाणाऱ्या लहान मुलांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. पाण्यात साप येण्याचाही धोका असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ग्रामपंचायत पिंपळीने मासिक सभेत ठराव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अधिकृत पत्राद्वारे कार्यवाहीची मागणी केली.

या पाठपुराव्यानंतर सभापती सौरभबाबा शिंदे, उपसभापती गोरखबाबा महाडिक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. असटेकर यांनी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून तुंबलेले गटार वाहते केले. त्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहू लागले असून ग्रामस्थ, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामपंचायत पिंपळी व ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित असलेला हा प्रश्न वेळेत मार्गी लागल्याने भविष्यात संभाव्य अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांनी केलेल्या समन्वयातून समाजाभिमुख कार्याचे एक सकारात्मक उदाहरण पिंपळी येथे पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments