सातारा जिल्ह्यात
मुसळधार पावसाचा कहर
महाबळेश्वरमध्ये 266 मिमी पाऊस
कोयना धरणात 25 हजार क्युसेक्स आवक
संतोष शिराळे, सातारा :
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये तब्बल 266 मिमी पावसाची नोंद झाली असून दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. सातारा शहरात 44.2 मिमी पाऊस झाला आहे.
कोयना धरणात मोठी पाण्याची आवक
आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी 2051.01 फूट झाली आहे. धरणात 18.19 टीएमसी (17.28%) एकूण तर 13.07 टीएमसी (13.05%) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात 25,008 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
नावली गावावर संकट
महाबळेश्वरजवळील नावली गावात मुसळधार पावसामुळे शेतजमीन, घरे आणि रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत असून ती कोसळल्यास खालच्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धबधबे ओसंडून वाहू लागले
ओझर्डे, ठोसेघर, वजराई, भांबवली, ऐकीव लिंगमळा, भिलार परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. सर्वत्र हिरवाईची चादर पसरली असून या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र प्रशासनाने धबधबे व धोकादायक ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कुडाळ–मेढा मार्गावरील वाहतूक वळवली
कुडाळ ते मेढा रस्त्यावरील निरंजना (कुडाळी) नदीवरील पुलाचे काम सुरू असताना नदीला मोठा पूर आल्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
सातारा शहरात झाड कोसळले
सातारा येथील विसावा नाका परिसरात झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यासमोर मोठे झाड गेटसह रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. संबंधित यंत्रणांनी झाड हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
आंबेनळी घाट सोमवारपर्यंत राहणार बंद
मुसळधार पावसाचा इशारा, भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट मार्ग (राज्य महामार्ग क्र. १३९) ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.
जोर येथे सर्वाधिक 289 मिमी
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रांच्या अहवालानुसार जोर येथे सर्वाधिक 289 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील घाटमाथा आणि धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून कोयना, महाबळेश्वर, कास, बामणोली, प्रतापगड, ठोसेघर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.
24 तासांतील प्रमुख ठिकाणच्या पावसाची नोंद (मिमी):
जोर – 289
सोनत – 192
सांडवली – 165
कास – 152
धोम-बलकवडी – 144
ठोसेघर – 141
मोळेश्वर – 136
प्रतापगड – 114
बामणोली – 112
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असून प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे, धबधबे आणि पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. घाटमाथ्यावर दाट धुके असल्याने वाहनचालकांनीही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!