आळंदी–पंढरपूर आषाढी

वारीसाठी विश्वंभर बाबा

 दिंडीचे बुधवारी प्रस्थान

मेढा प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पारंपरिक वारीसाठी विश्वंभर बाबा दिंडी सोहळा वारकरी सेवा मंडळ, मेढा विभाग (ता. जावली, जि. सातारा) यांच्या वतीने दिंडी क्रमांक १६९ चे प्रस्थान होणार आहे.

ही दिंडी वै. ह.भ.प. भिकोबा महाराज देशमुख (गांजे) यांच्या प्रेरणेने गेल्या ३० वर्षांपासून अखंडपणे वारीची परंपरा जपत आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी दिंडीचे प्रस्थान बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी श्री विठ्ठल मंदिर, मेढा येथून होणार असून, वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

दिंडी प्रमुख म्हणून ह.भ.प. गुरुवर्य अतुल महाराज देशमुख (गांजे) मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, भजनी मंडळ, प्रवचनकार, मृदुंगमणी, गायक आणि शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

"जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया" या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान होणार असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.