देशसेवेच्या वाटेवर झेपावलेल्या तरुणांचा दापवडीत नागरी सत्कार; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान


देशसेवेच्या वाटेवर

झेपावलेल्या तरुणांचा

दापवडीत नागरी सत्कार

दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान

पाचगणी : जावळी तालुक्यातील दापवडी येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काटवली यांच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गाव व परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या गौरव सोहळ्याच्या प्रारंभी कै. दत्तात्रय कळंबे महाराज, स्व. स. म. बेलोशे गुरुजी आणि स्व. तुकाराम घाडगे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हाइस चेअरमन हरिश्चंद्र गावडे, बाबुराव रांजणे, प्रकाश रांजणे, विजय रांजणे, राम चिकणे, मधुकर पवार, इंदू शिंदे, भीमराव खरात, भरत रांजणे, शिवराम पवार, रामदास रांजणे, रामचंद्र बेलोशे, वसंत बेलोशे, अशोक बेलोशे, दीपक पार्टे तसेच व्यवस्थापक अनिल रांजणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहकार क्षेत्रातील आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या या संस्थेने यंदाही गुणवंतांना प्रोत्साहन देण्याची परंपरा कायम राखली. भारतीय वायूसेनेत निवड झाल्याबद्दल सई प्रतापराव पाटील, महाराष्ट्र लोहमार्ग पोलिस दलात निवड झाल्याबद्दल अजय अशोक साळुंखे आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल अक्षदा नथुराम रांजणे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. देशसेवा, सुरक्षा आणि शासकीय सेवेत यशस्वी वाटचाल करणाऱ्या या युवक-युवतींच्या यशामुळे दापवडीसह संपूर्ण जावळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी जावळी बँकेचे संचालक अजित कळंबे, काटवली सोसायटीचे चेअरमन शंकर पवार, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, काटवलीच्या सरपंच मीनाक्षी बेलोशे, रुईघरचे सरपंच अंकुश बेलोशे, रांजणीचे माजी सरपंच सुनील सपकाळ, घोटेघरचे माजी सरपंच दत्तात्रय रांजणे, पांडुरंग शिंदे, महादेव बेलोशे, अरविंद कळंबे, गोपाळ बेलोशे, वैभव पाटील, सुरेश बेलोशे, जगन्नाथ बेलोशे, सुरेश गोळे, चंद्रकांत रांजणे, विलास पाटील, बापूराव रांजणे, चंद्रकांत बेलोशे यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments