राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री
मकरंद पाटील यांना सर्वाधिकार
सातारा सांगली विधानपरिषद निवडणूक
भाजपला धास्ती; निर्णयाची करावी लागणार प्रतीक्षा?
संतोष शिराळे, सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींनी आपल्या भावना स्पष्टपणे मांडत पुढील राजकीय निर्णयाचा अधिकार एकमुखाने मकरंद पाटील यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींवरही सविस्तर चर्चा झाली. भाजपकडून राष्ट्रवादीच्या सदस्यांची फोडाफोड करण्यात आल्याची भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या काळात दोन सदस्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, तसेच तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेचीही बैठकीत आठवण करून देण्यात आली.या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या भावना वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सर्वाधिकार मकरंद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याने आता त्यांच्या निर्णयाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपलाही राष्ट्रवादीच्या अंतिम भूमिकेची प्रतीक्षा असून, मंत्री मकरंद पाटील वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून कोणता निर्णय घेतात, यावर सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीचे पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!