राज्य उत्पादन शुल्क
विभाग व स्थानिक गुन्हे
शाखेची संयुक्त कारवाई
२.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा : मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या अवैध हातभट्टी दारू, ताडी तसेच देशी-विदेशी मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. ११ ते १३ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यात एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ आरोपींकडून २ लाख ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत शनिवारी (१३ जून) वारुंजी फाटा, हजारमाची व तासवडे (ता. कराड) तसेच म्हावशी (ता. खंडाळा) येथे अवैध ताडी व देशी-विदेशी मद्यविक्री केंद्रांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत अनिल लक्ष्मण कदम, राहुल सोपान पडळकर, राजू मारुती पवार आणि पंकज मुकेश पाटील यांच्याकडून ९० लिटर ताडी, ५३.१० बल्क लिटर देशी-विदेशी मद्य तसेच एक दुचाकी वाहन असा एकूण १ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष मोहिमेदरम्यान सातारा जिल्ह्यातील भरारी पथक, फलटण, कराड, वाई-महाबळेश्वर आणि सातारा विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने एकूण १४ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५७.०६ लिटर देशी दारू, २४.४८ लिटर विदेशी दारू, १४० लिटर ताडी आणि हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे २,९२५ लिटर रसायन जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण, कराड विभागाचे निरीक्षक बापूसाहेब डोणे तसेच राज्य उत्पादन शुल्क आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना आवाहन
अवैध हातभट्टी दारू, बनावट ताडी किंवा इतर अवैध मद्याचे सेवन केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी दिली.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!