संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा
सुखकर, सुरक्षित पार
पाडण्यासाठी सर्व विभागांनी
समन्वयाने काम करावे
विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्या सूचना
लोणंद ते फलटण पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
स्वच्छता, पाणी, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर
सातारा प्रतिनिधी - संतोष शिराळे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुखकर, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, तसेच पालखी मार्गावरील आणि मुक्कामाच्या ठिकाणांवरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी गुरुवारी लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची आणि विविध पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका निरास्नान स्थळ, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखी तळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग आणि बरड येथील पालखी तळाला भेट देऊन कामांची माहिती घेतली. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, असे सांगताना त्यांनी लोणंद-तरडगाव-फलटण-बरड या मुख्य पालखी मार्गावरील अपूर्ण रस्ते कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पालखी मार्गावरील तात्पुरती बांधकामे आणि अतिक्रमणे स्थानिक प्रशासनाने त्वरित हटवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांवर भर
लोणंद आणि फलटण येथील पालखी तळांवर स्वच्छता, सपाटीकरण, चिखल टाळण्यासाठी मुरूम टाकणे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारी काळात मोठ्या प्रमाणात तात्पुरती आणि फिरती शौचालये उपलब्ध करून त्यांची स्वच्छता राखण्यासाठी २४ तास पथके तैनात ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमार्फत टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधसाठा सज्ज ठेवावा, तर महावितरणने पालखी मुक्कामस्थळी अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असेही त्यांनी सांगितले.
वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन
पालखी सोहळ्यादरम्यान लाखो भाविक आणि वारकरी सहभागी होत असल्याने गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सातारा पोलीस दलाने विशेष नियोजन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.
राव रामोशी पुलाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाची पाहणी करताना त्यांनी पुलाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात आवश्यक असल्यास पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
रस्त्याच्या रुंदीकरणावेळी काढण्यात आलेली झाडे पुन्हा पालखी मार्गावर लावण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि तयारीची सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांना दिली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!