जूनमध्येच सातारा जिल्ह्यातील धरणांची अवस्था बिकट
कोयना धरणातील पाणीसाठा 10.42 टक्क्यांवर
सातारा प्रतिनिधी - संतोष शिराळे : पावसाळ्याच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा अवघ्या 10.42 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरणांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दि. 4 जून 2026 रोजी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणाची पाण्याची पातळी 2043 फूट 11 इंच (622.986 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणातील एकूण (ग्रॉस) पाणीसाठा 15.56 टीएमसी म्हणजे 14.78 टक्के असून उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा 10.44 टीएमसी म्हणजे केवळ 10.42 टक्के इतकाच शिल्लक आहे.
धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने कोयना प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या अनेक जुन्या गावांचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. काही ठिकाणी जुन्या वाड्या, घरांचे पाया, देवस्थाने आणि रस्त्यांचे अवशेष पाण्याबाहेर आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. दरम्यान, सांगली पाटबंधारे विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी मागणी केल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार, दि. 3 जून रोजी दुपारी 2.30 वाजता कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. या माध्यमातून 1050 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
सध्या कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 1050 क्युसेक्स विसर्ग सुरू असून नदी स्ल्यूसमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रात उतरताना तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची चिंता अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!