गतवर्षीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात मान्सूनचा वेग मंदावला

गतवर्षीच्या तुलनेत सातारा 

जिल्ह्यात मान्सूनचा वेग मंदावला

सरासरी पावसाची केवळ 21 टक्के नोंद

गतवर्षी जिल्ह्यात 188.1 मिमी पाऊस

शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे 

संतोष शिराळे, सातारा |

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. 23 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार सातारा जिल्ह्यात सरासरी 31.5 मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या केवळ 21.2 टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 188.1 मिमी पाऊस झाला होता. 

जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद माण-दहिवडी (57.9 मिमी) आणि खटाव (55.7 मिमी) तालुक्यांत झाली असून, त्यापाठोपाठ महाबळेश्वर (58.6 मिमी) येथेही समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, पश्चिम भागातील पाटण तालुक्यात केवळ 14.1 मिमी, तर सातारा तालुक्यात 18.1 मिमी पावसाची नोंद झाल्याने पावसाची मोठी तूट कायम आहे.

तालुकानिहाय पावसाची स्थिती

महाबळेश्वर : 58.6 मिमी (8.3%)

माण-दहिवडी : 57.9 मिमी (71.8%)

खटाव : 55.7 मिमी (77%)

फलटण : 43 मिमी (60.1%)

जावळी-मेढा : 32.1 मिमी (25.9%)

खंडाळा : 28.6 मिमी (34.4%)

कोरेगाव : 26.8 मिमी (22.1%)

वाई : 22.6 मिमी (17.9%)

कराड : 19.6 मिमी (17.3%)

सातारा : 18.1 मिमी (11.2%)

पाटण : 14.1 मिमी (5.7%)

दरम्यान, राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. मंगळवार (23 जून) रोजी सकाळी 8 वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी 2038 फूट 11 इंच (621.462 मीटर) इतकी असून धरणात 13.81 टीएमसी (13.12 टक्के) एकूण पाणीसाठा, तर 8.69 टीएमसी (8.67 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या 24 तासांत कोयना येथे 12 मिमी (एकूण 35 मिमी), नवजा येथे 8 मिमी (एकूण 87 मिमी) आणि महाबळेश्वर येथे 11 मिमी (एकूण 37 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

धरण क्षेत्रात अद्याप नवीन पाण्याची आवक झालेली नसून इनफ्लो शून्य क्युसेक आहे. सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीपात्रात कोणताही अतिरिक्त विसर्ग करण्यात आलेला नाही. एकूण विसर्ग 525 क्युसेक इतका आहे.

संपूर्ण पुणे विभागात आतापर्यंत 39.5 मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 25.9 टक्के आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात सातारा जिल्ह्यात पावसाची लक्षणीय तूट दिसून येत असून, खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments