सांगली-साताऱ्यात महायुतीचा झेंडा फडकला; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय, पण १०० मतांच्या फटक्याने भाजपसाठी इशाराही!

सांगली-साताऱ्यात

महायुतीचा झेंडा फडकला

धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय, पण १०० मतांच्या फटक्याने भाजपसाठी इशाराही!

संतोष शिराळे, सातारा |

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने राज्यभरात ऐतिहासिक यशाची नोंद करत असताना, सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह खाशेराव जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, अपेक्षित संख्येपेक्षा जवळपास शंभर मते कमी मिळाल्याने भाजप आणि महायुतीच्या गोटात आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली आहे.

धैर्यशील कदमांना ५९३ मतांचे पाठबळ

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, धैर्यशील कदम यांना ५९३ मते, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार किशोर हणमंत धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही.

एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८८५ मते वैध, तर ९ मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा ४४३ मतांचा होता. धैर्यशील कदम यांनी तो सहज पार करत तब्बल ३०१ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

राज्यात महायुतीचा झंझावात; सांगली-साताऱ्यातही प्रभाव कायम

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत राज्यभर महायुतीने वर्चस्व सिद्ध केले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या एकत्रित ताकदीमुळे अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्याच पार्श्वभूमीवर सांगली-साताऱ्यातील विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विजय मोठा, पण अपेक्षित मतांपेक्षा कमी; भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महायुतीकडे असलेल्या संभाव्य मतसंख्येच्या तुलनेत धैर्यशील कदम यांना मिळालेली मते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेता भाजपला आणखी शंभरहून अधिक मतांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात काही मतांचे फुटणे किंवा क्रॉस व्होटिंग झाल्याचे संकेत मिळाल्याने पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. विजय निश्चित असला तरी अपेक्षित मतांचे संपूर्ण रूपांतर मतदानात करण्यात संघटनात्मक पातळीवर काही त्रुटी राहिल्या का, यावर आता महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांना विचारमंथन करावे लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मतमोजणी शांततेत आणि पारदर्शक वातावरणात

सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूमचे सील उघडण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. पाच टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. संपूर्ण मतमोजणीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महायुतीचा विजय, पण अंतर्मुख होण्याचीही वेळ

राज्यात महायुतीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच सांगली-साताऱ्यातील निकालाने एक वेगळा संदेश दिला आहे. धैर्यशील कदमांचा विजय निर्विवाद असला, तरी अपेक्षित मतांपैकी जवळपास शंभर मते हातातून निसटल्याने भाजप आणि महायुतीसाठी हा निकाल आनंदासोबतच आत्मपरीक्षणाची संधी ठरणार आहे.विजयाचा गुलाल उधळताना संघटनात्मक त्रुटी दूर करण्याची गरज अधोरेखित करणारा हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महत्त्वाचा धडा मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments