दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला;आरोपीला १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास

दारू पिण्यासाठी

पैसे न दिल्याच्या रागातून

कुऱ्हाडीने हल्ला

आरोपीला १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास

आरोपीला १२ हजार रुपयांचा दंड

त्यापैकी १० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश

संतोष शिराळे, सातारा |

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १ वर्ष ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची व १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा मंगळवारी (दि. २३) सुनावण्यात आली.

क्षेत्रमाहुली (ता. जि. सातारा) येथील रुबाब बेकरीसमोर २१ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपी अक्षय संभाजी आढाव (वय २१, रा. क्षेत्रमाहुली) हा मद्यधुंद अवस्थेत फिर्यादी ओंकार यशवंत देशमुख यांच्याकडे आला. "तू मला पैसे देत नाहीस, तुला जिवे ठार मारून टाकीन," अशी धमकी देत त्याने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओंकार देशमुख बाजूला झाल्याने तो वार चुकला. यानंतर फिर्यादी पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग करून कुऱ्हाडीने डोक्यावर वार करत जखमी केले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (डीजे-२) एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले.

परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे दाखले विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ अंतर्गत दोषी ठरवत १ वर्ष ९ महिन्यांची साधी कैद व १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव, अमित भरते, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोटे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक पवार यांनी खटल्याच्या पाठपुराव्याचे कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments