सुरूर-पोलादपूर रस्त्यात केवळ आर्थिक गैरव्यवहार नव्हे, तर संस्थात्मक खून; उपठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : संदीप शिंदे

सातारा : सुरुर ते पोलादपूर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची पत्रकार परिषद माहिती देताना मान्यवर. (छाया : अजित जगताप, सातारा)

सुरूर-पोलादपूर रस्त्यात

केवळ आर्थिक गैरव्यवहार 

नव्हे, तर संस्थात्मक खून

उपठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : संदीप शिंदे

सातारा | प्रतिनिधी

सुरूर-पाचगणी-महाबळेश्वर-पोलादपूर या ३२६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. हा केवळ भ्रष्टाचाराचा प्रकार नसून अधिकृत प्रशासकीय पाठबळावर झालेला "संस्थात्मक खून" असल्याचा गंभीर आरोप रयत राज संघटना, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी केला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सुरूर-पोलादपूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि कामकाजाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे काम संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाने सुरू आहे. घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. खड्डे, अपूर्ण कामे आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

एक महिन्यापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा मृत्यू झाला. तसेच दिल्ली पासिंगच्या कारचा घाटात झालेल्या अपघाताची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने शासन यंत्रणा या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिंदे यांनी दावा केला की, हैदराबादस्थित मुख्य कंपनीने नियुक्त केलेल्या स्थानिक उपठेकेदाराने सुमारे ३४ कोटी रुपयांची दलाली घेतली आहे. मूळ कामाची निविदा २८९ कोटी रुपयांची असताना त्यामध्ये १७.११ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी शिफारसी करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून, या उपठेकेदाराला नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उपठेकेदाराच्या माध्यमातून विविध बँकांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेची आणि त्यांनी स्थापन केलेल्या १३ कंपन्यांच्या व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

रस्त्याच्या कामात आधुनिक यंत्रसामग्रीऐवजी हाताने काँक्रीटीकरण करण्यात येत असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत त्यांनी कोअर टेस्टिंग आणि क्यूब टेस्टिंग करून संबंधित कंत्राट रद्द करावे, तसेच संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.

२४ मे २०२६ रोजी झालेल्या अपघाताला एक महिना उलटूनही संबंधित उपठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची खंत व्यक्त करत, तातडीने गुन्हा दाखल करून एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

"जोपर्यंत संबंधित उपठेकेदारावर कारवाई होऊन त्याला तुरुंगवासाची शिक्षा होत नाही, तोपर्यंत रयत राज संघटनेचा लढा थांबणार नाही," असा इशाराही संदीप शिंदे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला संदीप देशमुख, शिवाजी चोरट, शिव शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरूर-पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात यापूर्वी करण्यात आलेल्या महाबळेश्वर बंद आंदोलनाचीही आठवण करून देण्यात आली.


Post a Comment

0 Comments