हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी देणे आता बंधनकारक ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय

हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे 

पाणी देणे आता बंधनकारक

ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्वागत

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील ग्राहकांच्या आरोग्य आणि हक्कांच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाबा चालकांसाठी नवीन निर्देश जारी करत ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.

या आदेशानुसार, ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्या टेबलावर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची सक्ती करता येणार नाही. ग्राहकाने स्वतःहून मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, "येथे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे" असा फलक हॉटेलच्या दर्शनी भागात आणि ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित अन्न आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे ही हॉटेल चालकांची जबाबदारी आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

या संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, "नियमांचे पालन केले तर कोणावरही कारवाई होणार नाही; मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास कोणालाही वाचवता येणार नाही."

ग्राहक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल, तसेच सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments