एससी उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या मुंबई महामोर्चात लाखोंनी सहभागी व्हा : रमेश उबाळे

कोल्हापूर येथील दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे व अन्य पदाधिकारी.

एससी उपवर्गीकरणाविरोधात

३० जूनच्या मुंबई महामोर्चात

लाखोंनी सहभागी व्हा :

प. महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे

कोरेगाव | प्रतिनिधी

अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, ३० जून रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात पक्ष, गट-तट आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले.

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महामोर्चाच्या नियोजनासाठी रमेश उबाळे यांनी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्याला पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

उबाळे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातींना आरक्षणाचा अधिकार मिळवून दिला. हा अधिकार टिकविण्याची जबाबदारी आता समाजाची आहे. आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्वांनी जात, पंथ, गट, तट आणि राजकीय मतभेद विसरून एकत्र यावे. ३० जूनच्या मुंबईतील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवावी."

यावेळी उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि महामोर्चाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला. पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या दौऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकाही लढविणार

यावेळी रमेश उबाळे यांनी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली. पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेला वाढता प्रतिसाद मिळत असून, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पक्ष स्वबळावर लढविण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे कार्यकर्ते आमदार आणि खासदार म्हणून निवडून आणण्याचे आनंदराज आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



Post a Comment

0 Comments