गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसासह युवक जेरबंद

गावठी पिस्तूल, जिवंत

काडतूसासह युवक जेरबं

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

१ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी धडक कारवाई करत एका संशयित युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ओमकार दत्तात्रय कदम (वय २३, रा. रामलिंग रोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३(१), ७ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

रविवारी (दि. १५) पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोरेगाव-सातारा मार्गावरील सह्याद्री ढाब्यासमोर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या वेस्पा मोटारसायकल (क्र. एमएच-११ डीआर-०९८१) वरून गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मौजे महागाव (ता. जि. सातारा) येथील राजधानी हॉटेलशेजारी असलेल्या पैलवान पान शॉपसमोर सापळा रचला. थोड्याच वेळात संशयित इसम मोटारसायकलवरून येत असताना पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मॅगझीनसह एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments