साताऱ्याच्या राजकारणात
मैत्री, गळाभेट आणि कानगोष्टी
मतदान केंद्रावर उदयनराजे-शशिकांत शिंदे भेटीची जोरदार चर्चा
संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर घडलेल्या एका अनपेक्षित भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे एकाचवेळी मतदान केंद्रावर आल्यानंतर वातावरणातच उत्सुकता निर्माण झाली.
महाविकास आघाडीचे नेते शशिकांत शिंदे आणि ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील मतदान केंद्रावर आले होते. त्यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेही तेथे दाखल झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांमध्ये काही काळ चर्चा रंगली; मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या गळाभेटीने आणि कानगोष्टींनी.
शेजारी शिवेंद्रसिंहराजे उभे असतानाच उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगितले. एवढ्यावरच न थांबता, "भेटायला नंतरनं... कधीपण या, मला काय?" असे म्हणत उदयनराजेंनी पुन्हा काही शब्द कानात घातले. त्यानंतर त्यांनी ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील यांच्याशीही कानगोष्टी केल्याने या राजकीय त्रिकुटाच्या चर्चेने साताऱ्यात तर्कवितर्कांना उधाण आले.
या वेळी शशिकांत शिंदे यांनीही मिश्किलपणे चेंडू टाकला. "मी उदयनराजेंना म्हटलं, पाच मिनिटं भेटायला येतो. तेव्हा ते म्हणाले, आपण नंतर भेटू, फोनवर बोलू," असे शिंदे यांनी सांगितले. त्यावर उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत, "मैत्री ही मैत्री असते," असे उत्तर दिले. शिंदे यांनीही हसत त्याला दुजोरा दिला.
विधान परिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर रंगलेल्या या गळाभेटी, कानगोष्टी आणि "मैत्री"च्या संदेशाने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा पेटली आहे. या भेटीत नेमके काय बोलणे झाले, याचे गूढ कायम असले तरी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या कानगोष्टींचा अर्थ काय, याचीच चवदार चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!