"माझ्या पाठीमागे ज्येष्ठ नेत्यांची फौज" : अभयसिंह जगतापांचा मोठा दावा

सांगली-सातारा विधान परिषद

निवडणुकीत नवा ट्विस्ट..!

"माझ्या पाठीमागे ज्येष्ठ नेत्यांची फौज" : अभयसिंह जगतापांचा मोठा दावा

सातारा प्रतिनिधी- संतोष शिराळे : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे निवडणुकीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी महायुतीविरोधात उभे राहताना जगताप यांनी ही निवडणूक केवळ राजकीय नसून स्वाभिमानाची लढाई असल्याचे सांगत पत्रकार परिषदेत अनेक मोठे दावे केले आहेत.

"गद्दारी झाली तर ती भाजपकडेच होईल. आमच्याकडे कट्टर पक्षनिष्ठ लोक आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती नाही," असे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते आणि कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जगताप यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव घेत त्यांच्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. "या लढाईत बाळासाहेब पाटील यांचा मोठा हातभार असणार असून सातारा जिल्ह्यात त्यांची मदत निर्णायक ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदानाच्या गणिताबाबत बोलताना त्यांनी सुमारे ५०० मते खेचून आणण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. "हे लक्ष्य आम्ही निश्चितच गाठू," असा दावा त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक ताकदीवरही त्यांनी भाष्य केले. "त्यांच्याकडे किती पैसा आहे हे सर्वांना माहिती आहे. आर्थिक बरोबरी आम्हाला शक्य नाही. मात्र ही निवडणूक पैशावर नव्हे तर विचारांवर जिंकली जाईल," असे ते म्हणाले.

माण-खटावचे आमदार शेखर गोरे यांच्याबाबत विचारले असता, "त्यांच्याशी चर्चा झाली नसली तरी माणदेशी माणूस म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहतील, असा मला विश्वास आहे," असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणताही दबाव आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "सांगली आणि सातारा हे राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत जिल्हे आहेत. या जिल्ह्यांचे राजकारण दूषित करण्याचे काम ज्या प्रवृत्तीने केले, त्यांच्याविरोधात ही लढाई आहे," असे सांगत त्यांनी या निवडणुकीला वैचारिक संघर्षाचे स्वरूप दिले. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या स्वाभिमानासाठी आपण मैदानात उतरल्याचा दावा करत जगताप यांनी "माझ्या पाठीमागे अनेक ज्येष्ठ नेत्यांची फौज उभी आहे," असे वक्तव्य केले. त्यांच्या या दाव्यामुळे निवडणुकीतील पडद्यामागील राजकीय हालचालींविषयी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अभयसिंह जगताप यांच्या दाव्यांमुळे विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये कोणत्या बाजूने कल झुकतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे

१. "गद्दारी झाली तर भाजपकडेच"; अभयसिंह जगतापांचा थेट दावा

२. सातारा-सांगली विधान परिषदेत रंगत; जगतापांनी वाढवली राजकीय उत्सुकता

३. स्वाभिमान विरुद्ध सत्ता? अभयसिंह जगतापांच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण

४. ५०० मतांचे लक्ष्य, ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा; जगतापांचा आत्मविश्वास वाढला

Post a Comment

0 Comments