अलिबागच्या युवकाने
आजीचा खून करून
मृतदेह आंबेनळी घाटात
फेकल्याची दिली कबुली
प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांतून १०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर
पोलादपूर पोलिसांच्या माहितीवरून राबवली शोधमोहीम
वादळी पावसात बचाव पथकाची उल्लेखनीय कामगिरी
महाबळेश्वर : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एका युवकाने आपल्या आजीचा खून करून मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याची धक्कादायक कबुली दिल्यानंतर पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या धाडसी आणि अथक प्रयत्नांमुळे अखेर दरीत फेकलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले.
गुरुवारी (दि. ४ जून) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव यांना पोलादपूर पोलीस ठाण्याकडून संपर्क साधण्यात आला. आरोपीने आंबेनळी घाटातील दरीत मृतदेह फेकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र मृतदेह नेमका कोणत्या ठिकाणी टाकण्यात आला होता, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती. माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर आवश्यक बचाव साहित्य गोळा करून पथक आंबेनळी घाटाकडे रवाना झाले. घाट परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सुमारे दीड तासांच्या अथक शोधानंतर एका खोल दरीत अंदाजे १०० फूट खाली काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर टीमच्या सदस्यांनी दोरखंड आणि इतर बचाव साहित्याच्या सहाय्याने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. वादळी पाऊस, निसरडा कडा आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर सदस्यांनी मृतदेह सुरक्षितपणे दरीबाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या शोध आणि बचाव मोहिमेत सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, जयदीप शिंदे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव, अमित जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओमकार सोनावणे, शरद सावंत, निखिल सावंत आणि संकेत सावंत यांनी सहभाग घेतला. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे पोलिस तपासाला महत्त्वाची मदत मिळाली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!