वाठार पोलिसांची गांजा विक्रेत्या
महिलेविरुद्ध धडक कारवाई
२३ हजारांचा गांजा जप्त, महिलेला अटक
दोन दिवसांची पोलीस कोठडी
वाठार स्टेशन : वाठार पोलीस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध धडक कारवाई करत ९३१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दि. ३ जून २०२६ रोजी सुशील भोसले यांना गोपनीय माहितीदारामार्फत वाठार स्टेशन गाव हद्दीत वाठार-लोणंद मार्गालगत असलेल्या वस्तीमध्ये एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची लेखी परवानगी घेऊन कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यामध्ये एक महिला पांढऱ्या बारदान्याच्या पिशवीसह संशयास्पदरीत्या बसलेली आढळून आली. महिला पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचे नाव रुपाली लक्ष्मण बुधावले (वय ३२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले. तिची व तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता गांजा वनस्पतीचे शेंडे, पाने, फळे आणि बिया असलेला ९३१ ग्रॅम वजनाचा ओलसर व वाळलेला गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत २३,२७५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोरेगाव यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करीत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, नायब तहसीलदार सुनिता दिमते, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, सहाय्यक फौजदार बुवासो वाघमारे, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, दीपक साबळे, किरण जाधव, विठ्ठल काळे, एकनाथ सरगर, अधिक शेलार, चालक संदीप गोरे, विजय ढाणे तसेच महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव, माधुरी दीक्षित आणि पूजा जगताप यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!