जूनच्या पहिल्याच आठवड्यात
धरणांची अवस्था बिकट
कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा 10.15 टक्क्यांवर
सातारा प्रतिनिधी - संतोष शिराळे : पावसाळ्याच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा अवघ्या 10.15 टक्क्यांवर आला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरणांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दि. 6 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणाची पाण्याची पातळी 2043 फूट 02 इंच (622.757 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणातील एकूण (ग्रॉस) पाणीसाठा 15.29 टीएमसी म्हणजे 14.53 टक्के असून उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा 10.17 टीएमसी म्हणजे केवळ 10.15 टक्के इतकाच शिल्लक आहे.
धरणातील पाण्याची पातळी सातत्याने घटत असल्याने कोयना प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या अनेक जुन्या गावांचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. काही ठिकाणी जुन्या घरांचे पाया, देवस्थाने, रस्ते आणि वाड्यांचे अवशेष पाण्याबाहेर आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. सध्या कोयना धरण पायथा विद्युतगृहातून (KDPH) 1050 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून नदी स्ल्यूसमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. एकूण 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शनिवारी कोयना परिसरात 1 मिमी, नवजा येथे 8 मिमी तर महाबळेश्वर येथे 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात विशेष वाढ झालेली नाही. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रात उतरताना तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आता मान्सूनच्या सक्रिय आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची चिंता अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!