शेंद्रे येथे माजी सैनिक मेळावा उत्साहात;वीर माता, वीर नारींचा सन्मान


शेंद्रे येथे माजी सैनिक 

मेळावा उत्साहात

५ हजारांहून अधिक माजी सैनिकांचा सहभाग; वीर माता, वीर नारींचा सन्मान

सातारा : शेंद्रे येथील अभयसिंहराजे सांस्कृतिक भवनात मुख्यालय दक्षिण कमांडतर्फे तसेच १०९ इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य माजी सैनिक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल पाच हजारांहून अधिक माजी सैनिक, वीर माता, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली.

या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल विशाल अग्रवाल (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल), जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्र उपस्थित होते. यावेळी कर्नल संजीव बाजपेई (सेना मेडल), स्टेशन कमांडर कोल्हापूर व कमान अधिकारी १०९ इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा लाईट इन्फंट्री यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी तसेच राज्य प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते.


माजी सैनिकांच्या सेवेला गौरव देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी पेन्शन, ECHS, CSD सुविधा, पुनर्वसन योजना तसेच कुटुंबीयांसाठीच्या सहाय्य योजनांबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात वीर माता, वीर नारी आणि ज्येष्ठ माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ७० हून अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सेवेत असलेले तसेच निवृत्त अधिकारी व जवानांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

याशिवाय आरोग्य सेवा, कौशल्य विकास आणि पुनर्वसन योजनांबाबत विविध माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते. माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांमध्ये संवादात्मक सत्रही पार पडले. यामध्ये विविध समस्या, सूचना आणि अपेक्षांवर चर्चा करण्यात आली.

प्रमुख पाहुणे मेजर जनरल विशाल अग्रवाल यांनी आपल्या भाषणात, “माजी सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणे ही आमची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. भारतीय लष्कर आणि माजी सैनिक समुदाय यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments