शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाचा खून


शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या 

कारणावरून एकाचा खून

जावळी तालुक्यातील आर्डे येथील घटना

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मेढा : जावली तालुक्यातील आर्डे येथे शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सविता आगतराव जाधव (वय ५०, रा. आर्डे, ता. जावली) या शेतमजुरीचे थकीत पैसे मागण्यासाठी आरोपी अश्विनी दीपक जाधव व सुनिता विलास जाधव यांच्याकडे गेल्या होत्या. यावेळी पैसे मागण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे.

यानंतर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, अदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओकार विलास जाधव, विलास शामराव जाधव यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या घरावर धडक दिली. यावेळी फिर्यादी यांचे पती आगतराव बाबुराव जाधव (वय ५७) यांच्यावर कु-हाडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आगतराव जाधव यांचा मृत्यू झाला.

ही घटना दिनांक १९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे आर्डे, ता. जावली येथे घडली. मृतदेहाचे इनक्वेस्ट व शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments