बालकवी संमेलनात चिमुकल्यांच्या शब्दांना चढले स्फूरण

 


बालकवी संमेलनात

चिमुकल्यांच्या शब्दांना

चढले स्फूरण

खंडाळा पंचायत समितीचा उपक्रम , शालेय विद्यार्थ्यांना मिळाली संधी

खंडाळा : कविता ही कवीच्या अंतःकरणातून उमलते.  कवीच्या हृदयातून वाहणाऱ्या शब्द रचनेला स्वरूप देवून कवीता बनते. शब्दांना जोडलेले शब्द आणि यमकांनी दिलेली साद यातून साकारते कविता. प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांनाही अशाच शब्दांनी घेरले अन् कवितांची मैफीलीतून त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साकारला. शालेय मुलांच्या उत्स्फुर्त कवितांनी उपस्थितांची मनेही जिंकली.

खंडाळा येथील किसनवीर सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीने अहिरे आणि खंडाळा केंद्रातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला आणि काव्यरचनेला वाव मिळावा यासाठी जागतिक कवी दिनाचे औचित्य साधून बाल कवी संमेलन आयोजित केले होते. यामध्ये दोन्ही केंद्रातील ७५ बालकवींनी यामध्ये सहभाग घेतला होता. या केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनिता साबळे यांच्या संकल्पनेतून हे कवीसंमेलन बहरले.

या संमेलनाचे उद्‌घाटन गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, केंद्रप्रमुख सुनिता साबळे, कवी आनंदा भारमल, ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलांनी आई , बाप, आजी, शाळा, गाव, छत्रपती शिवाजीराजे, शंभूराजा, सावित्रीबाई फुले, उंदीरमामा, मांजर, मैत्री, पाऊस यांसह विविध विषयांवर अफलातून कविता सादर केल्या.


शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या प्रतिभेला वाव मिळाला. कविता लेखन आणि सादरीकरण यामुळे मुलांचे धैर्य वाढते. त्याचबरोबर वाचनाची आवड वाढणार आहे. मुलांचा उत्साह आणि त्यांनी केलेल्या रचना पाहता यामधून नवीन प्रतिभावंत कवी महाराष्ट्राला मिळतील.

- अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी 

Post a Comment

0 Comments