बालसंस्कार शिबिराचा नवीन 'म्हावशी पॅटर्न'

 


बालसंस्कार शिबिराचा

नवीन 'म्हावशी पॅटर्न'

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पहिलाच प्रयोग; म्हावशी प्राथमिक शाळेचा उपक्रम

खंडाळा : मुलांचा शालेय वयातच प्राथमिक सर्वांगीण शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा, त्यांचे मन संस्कारक्षम व्हावे आणि भारताचा सुसंस्कारीत नागरिक घडावा या उद्देशाने खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी निवासी विशेष बालसंस्कार शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामुळे मुलांमध्ये झालेला आमुलाग्र बदल हा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. या छोट्याशा शाळेने केलेल्या या भव्य उपक्रमाची सातारा जिल्ह्यात चर्चा झाली. हा उपक्रम जिल्ह्याला दिशादर्शक ठरला असून बालसंस्कार शिबिराचा नवीन 'म्हावशी पॅटर्न' जिल्ह्याला मिळाला आहे.

म्हावशी (ता. खंडाळा) येथील प्राथमिक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने या वर्षीचा शैक्षणिक उपक्रम म्हणून विशेष बालसंस्कार शिबीर निवासी स्वरूपात घेतले. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले. तीन दिवसांच्या या शिबिरात सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले. विशेषतः योग, व्यायाम, श्लोक, प्रार्थना, वेगवेगळ्या कार्यशाळा, बौद्धीक व्याख्याने, कथाकथन, लेखक आमच्या भेटीला, पारंपरिक खेळ, आधुनिक खेळ, संस्कार वर्ग, संस्कार दीप, मातापिता पाद्यपूजन, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन व संतुलन, परसबाग निर्मिती, सीड बॉल निर्मिती, आकाश निरिक्षण, आरोग्य जागृती, स्वावलंबी शिक्षण, चित्रकला मार्गदर्शनासह विविध उपक्रम घेण्यात आले.


या शिबिरात मुख्याध्यापिका नलिनी मांढरे यांनी व्यायाम व प्रार्थना घेतल्या. केशव कोदे यांचे 'सुसंगती सदा घडो ' या विषयावर व्याख्यान झाले, तर जगन्नाथ गार्डे यांनी सुंदर कथाकथन केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे यांनी लेखक होण्याचा प्रवास उलगडला. योग प्रशिक्षक स्वप्ना माळी, संदीप ननावरे, पूनम राऊत यांनी मुलांमध्ये संस्कारांची मूल्ये रुजवली. सत्यवान माळी, सचिन राऊत, दत्तात्रय धायगुडे, बबन जाधव यांनी खेळाची प्रात्यक्षिके दाखविली. चित्रकार उमेश पवार यांनी चित्र रेखांकनाचे धडे दिले. तसेच प्रशांत गंधाले यांनी शेकोटी कार्यक्रमात मुलांच्या सुप्त गुणांना वाव दिला.

या शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, केंद्रप्रमुख सुनिता साबळे यांच्या हस्ते झाले, तर समारोप गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्व शिबिरार्थींचा प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

टेन्टमध्ये राहण्याची मज्जा...

शिबिरात मुलांना राहण्यासाठी टेन्टची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव घेता आला. शहरी भागातील कॅम्पेनिंगचा प्रत्यक्ष अनुभव गावातील शाळेत मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकही खुश झाले.

मूल्यांची जोपासना...

या शिबिरातून श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वावलंबन, सहकार्य वृत्ती, देशप्रेम, प्रेमभावना, स्वयंशिस्त यांसह अन्य मूल्ये मुलांच्या अंगी जोपासली गेली.

ग्रामस्थांचे योगदान...

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष महेश राऊत, सरपंच कृष्णात भुजबळ, सोसायटीचे चेअरमन दिनकर राऊत, व्हा. चेअरमन प्रभाकर राऊत, प्रविण खंडागळे, गणेश भोजने, उमेश पवार, रोहित भुजबळ, अक्षय नेवसे, विजय राऊत, मोहन पाटील, रजनीकांत सोनवणे, प्रशांत देशमुख यांसह सर्व ग्रामस्थ, पालक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments