किसन वीर, खंडाळा कारखान्याच्या सभासदांना मिळणार साखर आठ वर्षांनंतर साखर वाटपाला सुरुवात; सभासदांसह बिगर सभासदांनाही लाभ



किसन वीर, खंडाळा 

कारखान्याच्या

सभासदांना मिळणार साखर

आठ वर्षांनंतर साखर वाटपाला सुरुवात; 

सभासदांसह बिगर सभासदांनाही लाभ

सातारा : प्रतिनिधी 

किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्याच्या सभासदांसह बिगर सभासदांनाही मंगळवार, दि. २७ ऑक्टोबरपासून साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास आठ वर्षांपासून बंद असलेले साखर वाटप पुन्हा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

प्रसिद्धीपत्रकानुसार, किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या ज्या सभासदांचा ऊस गाळपासाठी आलेला आहे, त्यांना प्रत्येकी १० किलो साखर देण्यात येणार आहे. ज्या सभासदांचा ऊस गाळपासाठी आलेला नाही, त्यांना ५ किलो साखर मिळेल. तसेच, ज्या बिगर सभासदांचा ऊस कारखान्यात गाळपासाठी आलेला आहे, त्यांनाही ५ किलो साखर देण्यात येणार आहे. या साखरेचा दर २० रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आला आहे.

स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड आवश्यक

साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कागदपत्राची छायांकित प्रतही सादर करावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांशिवाय साखर मिळणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत वाटप

साखरेचे वाटप संबंधित गट कार्यालयांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत करण्यात येणार आहे. सभासद आणि शेतकऱ्यांना साखर घेण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्या जवळच्या ठिकाणीच वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. साखर कोणत्या गट कार्यालयात मिळणार आहे, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या गट कार्यालयाशी किंवा संबंधित शेती कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आठ वर्षांनंतर साखर वाटप पुन्हा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे प्रमोद शिंदे यांनी नमूद केले. किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला घालून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील आणि कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments