जावळी तालुक्यात दुष्काळग्रस्त
पिकांचे गावोगावी पंचनामे सुरू
महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाची संयुक्त पाहणी
शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्यास प्रशासनाकडून सुरुवात
मेढा | प्रतिनिधी
जावळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी सातारा श्री. आशिष बारकुल आणि तहसीलदार जावळी श्री. प्रवीण मुदगुल यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या पथकांकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी व पंचनामे करण्यात येत आहेत.
दुष्काळाच्या परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्यासाठी ही कार्यवाही महत्त्वाची ठरत आहे. प्रशासनाच्या पथकांकडून संबंधित गावांमध्ये जाऊन पिकांची स्थिती, झालेली हानी तसेच उपलब्ध परिस्थितीची पाहणी केली जात आहे. यावेळी संबंधित शेतकरी व ग्रामस्थांकडूनही आवश्यक माहिती घेण्यात येत आहे.
शुक्रवारी निझरे, मालचौंडी, धनकवडी, म्हाते बुद्रुक व म्हाते खुर्द, करंडी, दुंद, कुसुंबी, काळोशी, गोंदेमाळ आदी गावांमध्ये पीक पाहणी व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली.
निझरे येथे पीक पंचनामा करताना ग्रामपंचायत अधिकारी श्री. अनिस दिवाण, सहा. महसूल अधिकारी श्री. संजय बैलकर, मंडळ अधिकारी श्री. संतोष भोसले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
मालचौंडी येथे कृषी सहाय्यक श्री. सपकाळ, सहा. महसूल अधिकारी श्री. संजय बैलकर, मंडळ अधिकारी श्री. संतोष भोसले तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पिकांची पाहणी करण्यात आली.
धनकवडी येथे ग्राम महसूल अधिकारी श्री. माळी, सहा. महसूल अधिकारी श्री. संजय बैलकर, मंडळ अधिकारी श्री. संतोष भोसले यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तर म्हाते बुद्रुक येथे ग्राम महसूल अधिकारी श्री. शीतल गुजर, सहा. महसूल अधिकारी श्री. संजय बैलकर, मंडळ अधिकारी श्री. संतोष भोसले तसेच संबंधित शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. तालुक्यातील अन्य गावांमध्येही महसूल व कृषी विभागाच्या पथकांकडून प्रत्यक्ष पाहणी सुरू असून, गावोगावी टप्प्याटप्प्याने पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व सवलती मिळण्यासाठी पीक नुकसानीची अधिकृत नोंद महत्त्वाची आहे. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या पथकांना आवश्यक माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन जावळीचे तहसीलदार श्री. प्रवीण मुदगुल यांनी केले आहे.
जावळी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता गावोगावी सुरू झालेल्या या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचे चित्र प्रशासनासमोर येणार असून, त्यानुसार पुढील मदत व उपाययोजनांना गती मिळणार आहे.









0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!