दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उमेश चव्हाण यांचे राज्यव्यापी अभियान; ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे उद्दिष्ट; रुग्ण हक्क परिषद व ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार; १११ गावांपर्यंत मदत पोहोचवणार

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

उमेश चव्हाण यांचे

राज्यव्यापी अभियान

५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे उद्दिष्ट

१११ गावांपर्यंत मदत पोहोचवणार

रुग्ण हक्क परिषद व ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार

सातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि रोजगाराच्या प्रश्नांमुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर जगण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी दुष्काळ निवारण अभियान सुरू करण्यात आले आहे. रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश समिती आणि ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य व किराणा किट, शेतकऱ्यांना बियाणे व खते, गरजू महिलांना साड्यांचे वाटप आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

दुष्काळग्रस्तांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण, पिण्याचे पाणी आणि शेतीला आधार देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातून मदतकार्याला सुरुवात होणार असून, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

५ हजार कुटुंबांना किराणा किट; १ हजार साड्यांचे वाटप

या अभियानांतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला तांदूळ, गहू, खाद्यतेल, साखर, मीठ, डाळी, मसाले, साबण आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असलेले किराणा किट देण्यात येणार आहे. प्रत्येक किटची किंमत ८४७ रुपये असून, दुष्काळामुळे उत्पन्नाचे स्रोत बाधित झालेल्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

शेतीच्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा शेती उभी करण्यासाठी बियाणे व खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील गरजू महिलांना एक हजार साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि आवश्यकतेनुसार मोबाईल मेडिकल क्लिनिकची सुविधाही नियोजित आहे.

१११ गावांसाठी सुमारे ४ कोटी ९४ लाखांचा उपक्रम

राज्यातील १११ दुष्काळग्रस्त गावांमध्ये विविध प्रकारची मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अन्नधान्य किट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, औषधे, आरोग्य शिबिरे, पाणी शुद्धीकरण सुविधा, दूध व पौष्टिक आहार, जनावरांसाठी चारा, पशुवैद्यकीय तपासणी, स्वच्छता साहित्य, तसेच शैक्षणिक आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. या संपूर्ण उपक्रमाचा अंदाजित खर्च सुमारे ४ कोटी ९४ लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

गरजू गावांनी लेखी अर्ज करावा

ज्या गावांना दुष्काळ निवारणासाठी मदतीची आवश्यकता आहे, त्या गावांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी पुढाकार घेऊन गरजू कुटुंबांची माहिती संकलित करावी. संबंधित गावाचे नाव, तालुका, जिल्हा, लाभार्थी कुटुंबांची माहिती आणि आवश्यक मदतीचा तपशील नमूद करून संस्थेकडे लेखी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे गरजेनुसार मदतीचे नियोजन करून ती संबंधित गावांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

‘दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी’ : उमेश चव्हाण

या अभियानाविषयी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले, “दुष्काळ ही केवळ पाण्याची समस्या नाही, तर ती सामान्य माणसाच्या जगण्याची, शेतकऱ्यांच्या भविष्याची आणि ग्रामीण कुटुंबांच्या अस्तित्वाची लढाई आहे. अशा कठीण परिस्थितीत दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. कोणतेही गरजू कुटुंब अन्नधान्याअभावी उपाशी राहू नये, शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार मिळावा आणि नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती आणि विविध संस्थांनी या उपक्रमात सढळ हस्ते योगदान द्यावे.”

या पत्रकार परिषदेला कार्यकारी संचालक अशोक शिंदे, समन्वयक अपर्णा मारणे साठे, संचालक अशोक काकडे, मुकेश मोहित आणि राजेश अडसूळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments