सेवा संकल्प अभियानातून जनसेवेला नवी दिशा देणार : अतुल भोसले; भाजप सातारा जिल्हा कार्यकारिणी व सेवा संकल्प अभियान नियोजन बैठक उत्साहात; संघटन बळकटीकरणावर भर

सेवा संकल्प अभियानातून 

जनसेवेला नवी दिशा देणार : 

आ. अतुलबाबा भोसले

भाजप सातारा जिल्हा कार्यकारिणी व सेवा संकल्प अभियान नियोजन बैठक उत्साहात

सातारा | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेला अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप देतानाच पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन भाजप सातारा जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी केले. आगामी काळात सातारा जिल्ह्यात विविध लोकाभिमुख सेवा उपक्रम राबवून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ नियोजन बैठक तसेच जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या आजवरच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाचे विविध उपक्रम, ‘सेवा संकल्प अभियान’ आणि जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जनसेवा हीच संघटनेची प्रमुख भूमिका मानून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच तळागाळातील नागरिकांशी पक्षाचा थेट आणि अधिक दृढ संवाद निर्माण करणे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासोबतच बूथ पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत संघटन अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यावरही चर्चा झाली.

‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ पक्षाचा उपक्रम न राहता जनतेच्या प्रत्यक्ष हिताशी जोडलेले अभियान ठरावे, यासाठी जिल्ह्यात विविध सेवा उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना आणि विविध सेवा पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, ज्येष्ठ नेते दिलीप येळगावकर, सुनील तात्या काटकर, सातारा जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या निमित्ताने आगामी काळात संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क आणि समाजोपयोगी सेवा उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात भाजपच्या जनसंपर्काला अधिक व्यापक स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments