जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील अडचणीत! भोसले-उंडाळकर समीकरणाने कऱ्हाडचे राजकीय गणित बदलले; तीन मतांच्या पराभवाची परतफेड होणार?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील अडचणीत! भोसले-उंडाळकर समीकरणाने कऱ्हाडचे राजकीय गणित बदलले; तीन मतांच्या पराभवाची परतफेड होणार?

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच कऱ्हाडच्या सहकारी सोसायटी मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोरील आव्हान अधिकच वाढले आहे. भोसले-उंडाळकर यांच्या संभाव्य एकत्रित ताकदीसमोर बाळासाहेब पाटील यांना जिल्हा बँकेत पुन्हा संचालक म्हणून जाण्याचा मार्ग यंदा खडतर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदारसंघ हा दिग्गजांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघातून मंत्री, आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कऱ्हाड मतदारसंघातील बदललेली समीकरणे यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

कृष्णा कारखाना निवडणुकीतील समीकरणाची आता परतफेड?

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आमदार डॉ. अतुल भोसले आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाला साथ दिली होती. या पाठिंब्याचा भोसले गटाला निवडणुकीत फायदा झाला. त्यावेळी झालेल्या राजकीय चर्चांमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भोसले गट उंडाळकरांना मदत करणार असल्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. आता त्याच समीकरणाची अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःच कऱ्हाडमधून अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचा स्वतंत्र पॅनेल झाला तरी उंडाळकर आपल्यासोबत असतील, असे सांगतानाच सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भोसले-उंडाळकर युतीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

मागील निवडणुकीतील तीन मतांचा निकाल ठरणार निर्णायक?

गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भोसले गट बाळासाहेब पाटील यांच्या सोबत होता. त्यामुळे त्या वेळी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव झाला होता. यंदा मात्र समीकरण उलटले असून भोसले गट उंडाळकरांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे मागील पराभवाची परतफेड करण्याची संधी उंडाळकर गटासमोर निर्माण झाली आहे.

उंडाळकर कुटुंबाची जिल्हा बँकेच्या राजकारणातील पार्श्वभूमीही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे वडील तथा माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी तब्बल पाच दशके सहकारी सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले. मात्र, मागील निवडणुकीत उदयसिंह पाटील यांना अवघ्या तीन मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर उंडाळकर गटाने गेल्या वर्षभरापासून जिल्हा बँकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजप स्वबळावर की महायुतीसोबत?

दरम्यान, भाजप जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार की महायुतीच्या माध्यमातून पॅनेल उभे करणार, यावरही कऱ्हाडच्या समीकरणांचा बराचसा खेळ अवलंबून आहे. सहकारी सोसायटी मतदारसंघात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मोठी मतशक्ती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भोसले-उंडाळकर समीकरणाला ही ताकद जोडली गेल्यास कऱ्हाडच्या मतदारसंघातील लढत अधिकच रंगण्याची शक्यता आहे.

एकीकडे मागील निवडणुकीतील तीन मतांचा हिशेब, दुसरीकडे कृष्णा कारखाना निवडणुकीतील राजकीय देवाणघेवाण आणि त्यातच भोसले-उंडाळकरांची नव्याने जुळलेली मोट—या तिन्ही घटकांमुळे बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक यंदा अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments