तपासणीसाठी निघाली होती… पण नियतीने हिरावले बाळ! दहिवडीजवळ भीषण अपघात; सहा महिन्यांच्या गर्भवती अंकिताचे बाळ उपचारादरम्यान दगावले, दोन्ही पायांना गंभीर दुखापत; रेहमान शेख यांचा मृत्यू

तपासणीसाठी निघाली होती… 

पण नियतीने हिरावले बाळ!

दहिवडीजवळ भीषण अपघात

सहा महिन्यांच्या गर्भवती अंकिताचे बाळ उपचारादरम्यान दगावले

दोन्ही पायांना गंभीर दुखापत

रेहमान शेख यांचा मृत्यू

म्हसवड | माणदेश नगरी, प्रतिनिधी

म्हसवड–फलटण मार्गावरील वडगाव (ता. माण) हद्दीतील लोणारबाबा परिसरात शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) झालेल्या भीषण अपघाताने माण तालुका हादरला आहे. एर्टिगा आणि इनोव्हा कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या दुर्घटनेत मोगराळे येथील रेहमान शेख (वय ३०) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

या अपघातातील अंकिता सुखदेव शिंगाडे (वय २३) यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. सहा महिन्यांच्या गर्भवती असलेल्या अंकिता या मोगराळे येथून दहिवडीतील रुग्णालयात नियमित वैद्यकीय तपासणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणारा तो प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी ठरला.

वडगावच्या लोणारबाबा परिसरात दोन वाहनांची भीषण धडक झाली आणि अंकिता गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने दहिवडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बारामतीमार्गे पुण्यात हलविण्यात आले.

पुण्यात उपचार सुरू असताना अंकिता यांच्या प्रकृतीचा विचार करून डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपचारांच्या या अत्यंत कठीण प्रसंगात सहा महिन्यांच्या गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका बाजूला स्वतःच्या जीवासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला जन्माआधीच बाळाला गमावण्याचे दुःख, अशी दुहेरी वेदना अंकिता आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळली आहे.

अंकिता यांचे माहेर टाकेवाडी, तर सासर मोगराळे. त्यामुळे या घटनेची बातमी समजताच दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या बाळाच्या आगमनाची कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत होते, त्याच बाळाला नियतीने जन्माआधीच हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात अंकिता यांच्यासह सोनाली बाळासो शिंगाडे (वय ३५), पायल सुखदेव शिंगाडे (वय २१) आणि तुकाराम शिवाजी जगदाळे (वय ३५) हेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दहिवडी, बारामती तसेच पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दहिवडीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर इनोव्हा कार समोरून येणाऱ्या एर्टिगा कारवर आदळली. या भीषण धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. दहिवडी पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अपघाताच्या कारणाबाबत पुढील तपास सुरू आहे. रेहमान यांच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आधार हरपला, तर अंकिताच्या अजन्म्या बाळाचा मृत्यू आणि तिच्या गंभीर दुखापतीने दोन कुटुंबांचे सुखच हिरावून घेतले. या दुर्घटनेने मोगराळे, टाकेवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे

Post a Comment

0 Comments