साताऱ्यात गुन्हेगारी टोळीला मोक्काचा दणका! दहशत निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुखासह चौघांविरुद्ध कठोर कारवाई; खूनाचा प्रयत्न, जबरी वसुली, हत्यार बाळगणे व धमकीचे गंभीर आरोप

साताऱ्यात गुन्हेगारी

टोळीला मोक्काचा दणका!

दहशत निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुखासह चौघांविरुद्ध कठोर कारवाई

खूनाचा प्रयत्न, जबरी वसुली, हत्यार बाळगणे व धमकीचे गंभीर आरोप

सातारा | प्रतिनिधी

सातारा शहर परिसरात टोळीची दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांकडून आर्थिक व इतर फायदे मिळविण्यासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध सातारा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने टोळीप्रमुखासह तीन आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २०४/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, मारामारी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात प्रेम गणेश पवार (वय २२, रा. शुक्रवार पेठ, सातारा) याला टोळीप्रमुख, तर प्रेम आबासाहेब अडागळे (वय २१, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शाहूपुरी), आनंद ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय २१, रा. जिव्हाळा कॉलनी, दिव्यनगरी, शाहूपुरी) यांना टोळी सदस्य म्हणून नमूद करण्यात आले आहे. याशिवाय एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही प्रकरणात समावेश आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी मोक्का कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावातील कागदपत्रे व दाखल गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी संबंधित गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कलम वाढविण्यास परवानगी दिली आहे. पुढील तपास सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत कमी करणे आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे या उद्देशाने अशा प्रकारची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून आगामी काळातही कठोर कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments