अल्पवयीन मुलीच्या
विनयभंग प्रकरणी
आरोपीवर कठोर कारवाई करा
...अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!
माण तालुक्यातील धक्कादायक प्रकार
पीडितेच्या आईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सातारा / प्रतिनिधी
माण तालुक्यातील एका गावात घडलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
याबाबत पीडित मुलीच्या आईने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले असल्याचे सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना संशयित आरोपीने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस नेले. तेथे तिची छेडछाड करून तिचा विनयभंग केला व घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर काही दिवसांनी २७ जुलै २०२६ रोजीच्या रात्री १.३० वाजता आरोपीने पुन्हा मुलीच्या घरासमोर येऊन दुचाकीचा हॉर्न वाजवत अश्लील हावभाव करत आरडाओरडा करून तिला त्रास देण्याचा आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पीडित मुलगी अत्यंत घाबरल्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मात्र, आईने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला.
या घटनेबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दाबले जात असल्याचा संशय आम्हास येत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून आरोपीस तात्काळ अटक करावी. अन्यथा आम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करावे लागेल आणि पुढे घडणाऱ्या सर्व घडामोडीस पोलीस प्रशासनच जबाबदार राहील," असा थेट इशारा पीडितेच्या आईने दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!