जावळीतील सोसायट्यांचे ठराव
कायदेशीर आणि लोकशाही
पद्धतीनेच : मंत्री शिवेंद्रसिंहराजे
जावळीतील वातावरण तापले, राजकारणाची पातळी राखा
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी दबाव, दहशत आणि राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हे आरोप फेटाळून लात विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.
जावळीतील सोसायट्यांचे ठराव हे कायदेशीर आणि लोकशाही पद्धतीनेच झाले असून, संचालकांनी कोणत्याही दबावाशिवाय आपल्या इच्छेने निर्णय घेतले आहेत, असा दावा शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. “आम्ही कधीही दादागिरीचे राजकारण केले नाही. जावळीतील जनता आणि सोसायटी संचालक आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
जावळी तालुक्यात शशिकांत शिंदे गट आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले गट यांच्यातील राजकीय संघर्ष या ठराव प्रक्रियेमुळे अधिक तीव्र झाला आहे. काही ठरावांवरून वाद निर्माण झाल्यानंतर विरोधकांकडून भोसले गटावर दबावतंत्राचा आरोप करण्यात आला. मात्र, हे आरोप राजकीय हेतूने केले जात असून प्रत्यक्षात सोसायट्यांच्या संचालकांनी आपला निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. ठराव प्रक्रियेवर आक्षेप घेण्याऐवजी विरोधकांनी वस्तुस्थिती स्वीकारावी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जावळी तालुक्यातील विविध विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांकडे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राजकीय समीकरण म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीचा ठराव आणि त्यामागील संचालकांचे राजकीय समर्थन याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भोसले गटाच्या बाजूने मोठ्या संख्येने ठराव झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असून, त्यामुळे जावळीतील राजकीय समीकरणांमध्ये भोसले गटाची पकड कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, या दाव्याबाबत अंतिम अधिकृत आकडेवारी आणि निवडणूक प्रक्रियेत त्याचे परिणाम स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजे यांनी राजकारणाची पातळी राखण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा आणि सोसायटी संचालकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी राजकारणाची पातळी सोडू नये. जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे. जावळीतील जनतेच्या पाठबळावर आम्ही योग्य उत्तर देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सोसायटी ठराव प्रक्रियेवरून सुरू झालेला हा वाद आता आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाचे स्वरूप अधिक स्पष्ट करणारा ठरत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या पार्श्वभूमीवर ठरावांची वैधता, संबंधित संस्थांच्या अधिकृत नोंदी आणि पुढील निवडणूक प्रक्रियेत त्याचे पडणारे परिणाम याकडे जावळी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!