मंत्री शिवेंद्रराजे भोसले
साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे!
शंभूराज देसाई पालकमंत्री असतानाच मंत्री जयकुमार गोरे यांची ‘मनापासूनची इच्छा’
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या राजकारणाला नवा ट्विस्ट
संतोष शिराळे| सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अंतर्गत राजकारणाला नवा रंग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, ही माझी मनापासूनची इच्छा आहे,’ असे जाहीर कार्यक्रमात म्हटल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गोरे यांनी हे वक्तव्य करताना कोणत्याही संघर्षाचा थेट सूर लावलेला नसला, तरी विद्यमान पालकमंत्र्यांच्या पदाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या मंत्र्याचे नाव पालकमंत्री म्हणून पुढे करणे, ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचे राजकारण, विविध गटांची मोर्चेबांधणी आणि महायुतीतील समन्वयाची कसोटी सुरू असताना हे वक्तव्य समोर आले आहे.
एका कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात साताऱ्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ घेत थेट शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख केला. ‘माझी मनापासूनची इच्छा आहे की मंत्री शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय संबंधित नेतृत्व घेईल, असे संकेत देतानाच गोरे यांनी ही आपली वैयक्तिक आणि मनापासूनची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित झाला आहे की, गोरे हे केवळ दोन मंत्र्यांमधील मैत्री आणि समन्वयाच्या दृष्टिकोनातून बोलले आहेत की सातारा जिल्ह्यातील भविष्यातील नेतृत्वाच्या समीकरणांकडेही त्यांचा हा सूचक इशारा आहे?
सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. २०२५ मध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लातूर आणि जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते, तर साताऱ्याची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडे कायम राहिली. अशा परिस्थितीत गोरे यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवेंद्रराजेंचे नाव पुढे करणे हा मुद्दा केवळ प्रशासकीय चर्चेपुरता मर्यादित राहत नाही. देसाईंचे विद्यमान पालकमंत्रीपद, शिवेंद्रराजेंचे सातारा जिल्ह्यातील राजकीय वजन आणि गोरे यांची जिल्ह्यातील सक्रिय भूमिका या तिन्ही बाबी एकत्र पाहिल्यास या वक्तव्याला राजकीय संदर्भ प्राप्त होतो.
जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा साताऱ्यात यापूर्वीही झाली आहे. जून २०२६ मध्ये सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या मतांच्या मुद्द्यावरून जयकुमार गोरे यांनी ‘आम्ही हिशोबात पक्के आहोत’ असा इशारा दिला होता. त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील महायुतीसोबत राहिले का? याबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला होता. त्या अगोदर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या काळातही महायुतीतील अंतर्गत समीकरणे चर्चेत आली. त्या काळात देसाई आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. देसाई यांनीही जयकुमार गोरे यांच्या काही वक्तव्यांवर सूचक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता गोरे यांनी शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने या पूर्वीच्या राजकीय पार्श्वभूमीचीही चर्चा होणे स्वाभाविक आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध विकास सेवा सोसायट्यांचे ठराव नुकतेच झाले. आता मतदार प्रतिनिधींची गणिते आणि पॅनेल उभारणी यामुळे राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना महायुती म्हणूनच जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मागील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत जे काही घडले त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असेही त्यांनी सूचकपणे सांगितले. देसाई यांच्या या भूमिकेनंतर अवघ्या काही दिवसांत गोरे यांनी शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चेला आणखी धार आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे गोरे यांनी शिवेंद्रराजेंचे नाव पुढे करताना देसाई किंवा अन्य कोणत्याही नेत्यावर थेट टीका केलेली नाही. उलट ‘पालकत्व आम्ही दोघे मिळूनही चालवू. आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि एकत्र मिळून जिल्ह्यासाठी काम करतो,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. यामुळे गोरे यांच्या वक्तव्याचा एक अर्थ असा लावला जात आहे की, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमधील दोन्ही मंत्र्यांनी अधिक प्रभावीपणे एकत्रित काम करावे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र राजकारणात पद आणि नेतृत्वाचे प्रश्न हे केवळ शब्दांपुरते मर्यादित राहत नसल्याने या विधानाचा राजकीय अर्थही लावला जात आहे.
जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही सकारात्मक उल्लेख करत, ‘देवाभाऊंचे आम्हा दोघांवर कायम आशीर्वाद आहेत,’ असे सांगितले. यातून भाजपमधील शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांच्यातील समन्वयाची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. एकीकडे महायुतीतील घटक पक्षांमध्ये जिल्हा पातळीवर राजकीय स्पर्धा आहे, तर दुसरीकडे राज्याच्या नेतृत्वाकडून महायुतीचा समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन्ही प्रवाहांच्या मध्ये सातारा जिल्ह्याचे राजकारण सध्या उभे आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक या सर्व राजकीय समीकरणांची खरी कसोटी ठरणार आहे. शंभूराज देसाई महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका घेत आहेत. तर जयकुमार गोरे शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाची इच्छा व्यक्त करत आहेत. शिवेंद्रराजे स्वतः जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्रस्थानी आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीसह इतर राजकीय गटही आपापली ताकद पणाला लावत आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीतील पॅनेलची रचना, ठरावांचे गणित, प्रत्यक्ष मतदान आणि निकालानंतरची सत्ताकेंद्रे यावर साताऱ्याच्या पुढील राजकीय समीकरणांची दिशा अवलंबून राहणार आहे.
सध्या साताऱ्याचे पालकत्व शंभूराज देसाई यांच्याकडे असताना जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्रीपदाची व्यक्त केलेली इच्छा अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. हा केवळ दोन मित्रांमधील विकासाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे? की जिल्ह्यातील नेतृत्वाच्या समीकरणात भविष्यात बदल होण्याची शक्यता व्यक्त करणारा राजकीय संदेश? की जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत ताकदीचे प्रदर्शन?
या प्रश्नांची उत्तरे सध्या स्पष्ट होत नसली तरी एक गोष्ट मात्र निश्चित सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जयकुमार गोरे यांनी टाकलेला ‘पालकमंत्री’चा हा राजकीय डाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे. आता या वक्तव्यावर विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई काय भूमिका घेतात, शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया काय असते आणि महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व या समीकरणाकडे कसे पाहते, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘एकाच जिल्ह्यात दोन मंत्री असणे ही भाग्याची गोष्ट’
मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याला मिळालेल्या राजकीय ताकदीचा उल्लेखही केला. एकाच जिल्ह्यात दोन मंत्री असणे आणि दोघांकडे महत्त्वाची खाती असणे ही सहजासहजी मिळणारी संधी नसल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम, जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांसारखे नेते एकाच काळात मंत्री होते, याचा दाखला देत अशा प्रकारच्या राजकीय ताकदीचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवेंद्रराजे पालकमंत्री आणि जयकुमार गोरे यांचे सहकार्य, या संभाव्य समीकरणाकडे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिले असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसते.
शंभूराज देसाईंच्या ‘पालकत्वा’वर प्रश्नचिन्ह की केवळ मैत्रीचा सूर?
जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे विधान विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्रीपदाला आव्हान आहे का? याचे सहज सरळरित्या उत्तर सध्या देता येणार नाही. कारण गोरे यांनी देसाईंचे नाव घेऊन पालकमंत्री बदलण्याची मागणी केलेली नाही. त्यांनी केवळ शिवेंद्रराजेंनी पालकमंत्री व्हावे, ही आपली ‘मनापासूनची इच्छा’ असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे अधिकृत मागणीपेक्षा हे विधान राजकीय इच्छा, वैयक्तिक मैत्री आणि भविष्यातील नेतृत्वाच्या शक्यतेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
शरद पवारांच्या भेटीनेही जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी चर्चेला उधाण
दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची घटना देखील चर्चेत आली होती. या भेटीबाबत देसाई यांनी ती सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले आणि जिल्हा बँक किंवा अन्य राजकीय विषयांवर चर्चा चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यातच आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताज्या वक्तव्याची भर पडल्याने जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता जिल्ह्यातील राजकीय ताकदीची मोठी चाचणी बनल्याचे चित्र आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!