सुरूर ब्रिजखाली कमरेला पिस्तूल घेऊन फिरणारा आरोपी भुईंज पोलिसांच्या पेट्रोलिंगमध्ये जेरबंद; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी

सुरूर ब्रिजखाली कमरेला पिस्तूल

घेऊन फिरणारा आरोपी भुईंज

पोलिसांच्या पेट्रोलिंगमध्ये जेरबंद

४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी

भुईंज | प्रतिनिधी

सुरूर (ता. वाई) येथील ब्रिजखाली कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका युवकाला भुईंज पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांच्यासह सरकारी वाहनातून पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. मौजे कवठे, ता. वाई गावच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना सपोनि ताटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुरूर गावच्या हद्दीतील सुरूर ब्रिजखाली प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरूर, ता. वाई) हा संशयास्पदरीत्या उभा असून त्याच्या कमरेला पिस्तूल आहे.

माहिती मिळताच पोलिस हवालदार आप्पा कोलवडकर यांनी दोन पंचांना बोलावून घेतले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस पथक आणि पंचांनी घटनास्थळी जाऊन माहितीची खात्री केली. यावेळी बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम सुरूर ब्रिजखाली उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पिस्तूल जप्त करून संशयितास ताब्यात घेतले.

या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६ नोंद करण्यात आला असून, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडे देशी बनावटीचे पिस्तूल नेमके कोणाकडून आले, त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, तसेच पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय आकाश मोरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments