जावळीतील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे- शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर; ‘सामाजिक’ कार्यक्रमाने वाढवली राजकीय उत्सुकता! एक मंत्री, तर दुसरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष; महिनाभराच्या संघर्षानंतरची भेट चर्चेच्या केंद्रस्थानी

जावळीतील राजकीय

संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

शशिकांत शिंदे- शिवेंद्रराजे  

एकाच मंचावर

‘सामाजिक’ कार्यक्रमाने वाढवली राजकीय उत्सुकता!

एक वजनदार मंत्री, तर दुसरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष

महिनाभराच्या संघर्षानंतरची भेट चर्चेच्या केंद्रस्थानी

पुणे | प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील राजकीय संघर्षाला गेल्या काही दिवसांत धार आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच मंचावर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. निमित्त होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे! मात्र उपस्थिती होती जावळीच्या राजकारणातील दोन प्रमुख ध्रुवांची...!

जावळीमध्ये मागील काही महिन्यांमध्ये सोसायटी ठराव, आरोप-प्रत्यारोप आणि परस्परविरोधी भूमिकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या राजकीय प्रभावाला आव्हान देणारी भाषा होत असतानाच, आज एका सामाजिक व्यासपीठावर शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची झालेली एकत्र उपस्थिती राजकीय लोकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

निगडी (पुणे) येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात सातारा-कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्हा मित्र मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मात्र, व्यासपीठावर राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची उपस्थिती असल्याने कार्यक्रमाला साहजिकच राजकीय परिमाण प्राप्त झाले होते. 

विशेष म्हणजे, एक जण सत्ताधारी व्यवस्थेतील मंत्री आणि दुसरे राज्यातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षाच्या संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे या दोघांची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती ही केवळ औपचारिकता मानायची की, त्यामागे पुढील दोन महिन्यात होणाऱ्या सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संदेश दडला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या महिनाभरात जावळीतील स्थानिक राजकारणात सोसायटी ठरावाच्या निमित्ताने घडलेल्या घडामोडींमुळे दोन्ही गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. सोसायटी ठरावाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद, त्यानंतरची राजकीय वक्तव्ये आणि एकमेकांच्या प्रभावाला आव्हान देण्याची सुरू झालेली भाषा यामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकाच मंचावर उपस्थित राहून सामाजिक कार्यक्रमाला महत्त्व दिले. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक प्रश्न, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजाशी असलेले ऋणानुबंध यासाठी एकत्र येण्याची राजकीय परंपरा या निमित्ताने दिसून आली.

या भेटीकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जावे का, याबाबत मात्र सध्या कोणतेही अधिकृत भाष्य करता येणार नाही. कार्यक्रमाचा मूळ उद्देश सामाजिक असल्याने दोन्ही नेत्यांची उपस्थिती त्याच चौकटीत पाहणे योग्य ठरेल. मात्र, राजकारणात दृश्य प्रतिमा आणि वेळेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे जावळीतील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही एकत्रित उपस्थिती चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. एकीकडे राजकीय पातळीवर एकमेकांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या भूमिका, तर दुसरीकडे सामाजिक कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र उपस्थिती..! या विरोधाभासामुळे जावळीच्या राजकारणात ‘राजकीय संघर्ष कायम राहणार की भविष्यात संवादाची काही नवी दारे उघडणार?’ हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री आहेत. त्यामुळे दोघांची भेट ही केवळ स्थानिक नेत्यांची भेट नसून राज्याच्या राजकारणातील दोन वेगळ्या राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची भेट म्हणूनही पाहिली जात आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असला, तरी जावळीतील तापलेल्या राजकीय वातावरणात मंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची एकाच मंचावरील उपस्थिती हीच या कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चेत राहिलेली ‘राजकीय बातमी’ ठरली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य) होते. आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी नगरसेवक प्रकाशशेठ बाबर, माजी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर शैलजाताई मोटे, नगरसेविका शितलताई वेणीकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रवासीय कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments