५४ गावांच्या सुरक्षेसाठी
७३० युवक मैदानात
दहिवडी पोलिसांचा ग्राम सुरक्षा दलाचा उपक्रम
रात्रीची गस्त, संशयास्पद हालचालींवर नजर
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेला भक्कम साथ
दहिवडी | प्रतिनिधी
गावागावांतील चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, शेतमाल चोरीसह अन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५४ गावांमध्ये ७३० युवकांची ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा उभी राहिली आहे. पोलीस आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून उभारण्यात आलेल्या या सुरक्षा दलामुळे ग्रामीण भागातील प्रतिबंधात्मक पोलिसिंगला मोठी चालना मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात ग्राम सुरक्षा दलाच्या स्थापनेला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून ५४ गावांतील इच्छुक युवकांना सहभागी करून घेत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली. ग्राम सुरक्षा दलाचा स्थापना व मार्गदर्शन कार्यक्रम २९ ऑगस्ट २०२६ रोजी दहिवडी कॉलेज, दहिवडी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राम सुरक्षा दलातील युवकांना प्रत्यक्ष सुरक्षेच्या कामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते सदस्यांना टी-शर्ट, काठी, शिट्टी आणि बॅटरी यांचे वाटप करण्यात आले. ग्राम सुरक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीपाळपण, स्वरूपखानवाडी आणि मार्डी येथील पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
ग्राम सुरक्षा दलातील युवकांकडून गावांमध्ये रात्रीची गस्त घालणे, संशयास्पद व्यक्ती अथवा हालचालींवर लक्ष ठेवणे आणि कोणतीही अनुचित घटना आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे, अशी प्रतिबंधात्मक स्वरूपाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात पोलिसांची उपस्थिती आणि ग्रामस्थांची सतर्कता यांचा प्रभावी समन्वय साधला जाणार आहे. चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी आणि शेतमाल चोरीसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ग्राम सुरक्षा दल पोलिसांसाठी महत्त्वाची मदत ठरण्याची अपेक्षा आहे.
पिंगळे म्हणाले, गावाची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ती अधिक सक्षम होऊ शकते. ‘गावातील सुरक्षा ही माझी जबाबदारी’ ही भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण करणे हा ग्राम सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावात घडणाऱ्या संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचल्यास गुन्हे रोखण्यास मोठी मदत होते. त्यामुळे युवकांचा हा सहभाग ग्रामीण सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दहिवडी पोलिसांनी अल्पावधीत ५४ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून ते कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे कौतुक केले. लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी आदर्श ठरू शकतो.
ग्राम सुरक्षा दलामुळे पोलीस, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. गावातील संशयास्पद हालचाली, गुन्ह्याची शक्यता किंवा अनुचित घटना यांची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला अधिक वेग मिळणार आहे. ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता ‘पोलीस, ग्रामस्थ व युवक’ या त्रिसूत्रीवर मजबूत करण्याचा दहिवडी पोलिसांचा हा उपक्रम ठरणार आहे.
कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य श्री. खत्रे, दहिवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार, विविध गावांतील पोलीस पाटील तसेच ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पा गायकवाड यांनी केले. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी आभार मानले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!