सुट्टीवर आलेल्या जवानाच्या घरातून सोन्याची चेन चोरी; २४ तासांत गुन्ह्याचा छडा; रहिमतपूर पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई; २ लाखांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत; स्थानिक सोनारांच्या सतर्कतेमुळे विधिसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात

सुट्टीवर आलेल्या

जवानाच्या घरातून

सोन्याची चेन चोरी

२४ तासांत गुन्ह्याचा छडा

रहिमतपूर पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई

दोन लाखांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

सोनारांच्या सतर्कतेमुळे विधिसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात

रहिमतपूर | प्रतिनिधी

सुट्टीवर घरी आलेल्या आर्मी जवानाच्या घरातील टेबलवर ठेवलेली सोन्याची चेन चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या २४ तासांत रहिमतपूर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत २ लाख रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक सोनारांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरीच्या सोन्याच्या चेनची विक्री करण्याच्या प्रयत्नाचा पोलिसांना सुगावा लागला आणि विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले.

रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारीव येथे राहणारे आर्मी जवान धनंजय संतोष पोळ हे २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत आंघोळीसाठी गेले होते. आंघोळीपूर्वी त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून खोलीतील टेबलवर ठेवली होती. त्यानंतर ते शेतातील कामासाठी बाहेर गेले. दुपारी सुमारे २ वाजता शेतातून घरी परतल्यानंतर टेबलवर ठेवलेली सोन्याची चेन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात सर्वत्र शोध घेऊनही चेन न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने ती चोरी केल्याचा संशय आल्याने त्यांनी रहिमतपूर पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

जवानाच्या घरात चोरी झाल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांचे जाळेही सक्रिय करण्यात आले. तपास सुरू असतानाच चोरी केलेली सोन्याची चेन एका सराफाकडे विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना स्थानिक सोनारांकडून मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित विधिसंघर्षित बालकास शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित विधिसंघर्षित बालकाने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाची, गोल कड्यांच्या डिझाइनची सुमारे २ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तपास पूर्ण करून चोरीचा संपूर्ण १०० टक्के मुद्देमाल जप्त केल्याने रहिमतपूर पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. संबंधित विधिसंघर्षित बालकाविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

या गुन्ह्याचा छडा लावण्यात रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्थानिक सोनारांनी दाखविलेली सतर्कता महत्त्वपूर्ण ठरली. चोरीचा संशय असलेले दागिने विक्रीसाठी आणले जात असल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे किती महत्त्वाचे आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. बिल, पावती किंवा मालकीचा योग्य पुरावा नसलेले सोन्याचे दागिने खरेदी करू नयेत. तसेच घाईघाईने दागिने किंवा इतर संशयास्पद साहित्य विक्री करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिक व व्यापाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन रहिमतपूर पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक एम. एम. खान, सपोफौ जयराम पवार, दीपक जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल बर्गे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, अमर भोसले, समाधान देशमुख आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्पिता गायकवाड यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. रहिमतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत चोरीचा तपास लावून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या जलद आणि कौशल्यपूर्ण तपासाचे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments