वीर जिवाजी महाले स्मारकासाठी पर्यटन विभागाकडून एक कोटींचा निधी; नितीनराजे शिंदे यांच्याकडून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा सत्कार

वीर जिवाजी महाले स्मारकासाठी

पर्यटन विभागाकडून

एक कोटींचा निधी मंजूर 

नितीनराजे शिंदे यांच्याकडून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा सत्कार

संतोष शिराळे : सातारा

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागामार्फत १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पुढाकारातून हा निधी उपलब्ध झाल्याने स्मारक उभारणीच्या कामाला मोठी चालना मिळणार आहे.

या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे माजी आमदार तसेच प्रतापगड विकास प्राधिकरणाचे निमंत्रित सदस्य नितीनराजे शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रमुख उपस्थित होते.

प्रतापगड परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच इतिहासातील शौर्यगाथा जतन करण्याच्या दृष्टीने वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. अफझलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे स्मारक उभारण्यात येणार असल्याने इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे निमंत्रित सदस्य मिलिंद एकबोटे, विजय नायडू, काका धुमाळ, अमोल जाधव तसेच प्राधिकरणाचे इतर सदस्य उपस्थित होते.

प्रतापगड परिसराच्या ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, वीर जिवाजी महाले स्मारकामुळे या परिसराच्या पर्यटन आकर्षणात आणखी भर पडणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments