सातारा जिल्ह्यात
पावसाचा कहर कायम
कोयना धरणात ८९,६०० क्युसेक्स आवक
ठिकठिकाणी पडझडमुळे लाखोचे कसान
भिंती कोसळल्या, झाडे पडली, दरड हटवून वाहतूक पूर्ववत
संतोष शिराळे, सातारा :
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सोमवारीही कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भिंती कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, शाळांचे नुकसान अशा घटना घडल्या असून प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले आहे. धरणांमध्येही पाण्याची आवक वेगाने वाढत आहे.
कोयना धरणात आवक वाढली
सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी ६३३.२९८ मीटर (२०७७.०९ फूट) झाली आहे. धरणात ३०.६७ टीएमसी (२९.१४ टक्के) एकूण व २५.५५ टीएमसी (२५.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणात ८९,६०० क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असून अद्याप धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यात सरासरी ५२.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील सरासरी पर्जन्यमान १६१.४ मिमी झाले आहे. महाबळेश्वर (२८६.२ मिमी), जावळी-मेढा (१५३.५ मिमी) आणि वाई (८८.४ मिमी) येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे
शाळा, घरे व जनावरांचे नुकसान
खंडाळा तालुक्यातील मिरजे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत कोसळून शेजारील महादेव सोनावणे यांच्या गोठ्यावर पडली. या दुर्घटनेत एक शेळी व एक करडू दगावले. भादे येथे बाळासाहेब साळुंखे यांच्या घराची भिंत कोसळली, तर कारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले.
रस्ते पुन्हा खुले
मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील दरड हटवून वाहतूक सुरू करण्यात आली असून साफसफाईचे काम सुरू आहे. कराड–चिपळूण महामार्गावरील पडलेले झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तसेच पाटण मार्गावरील नारळवाडी येथे रस्त्यावर पडलेले मोठे झाड JCB च्या सहाय्याने हटविण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले.
महाबळेश्वरमध्ये अफवांवर विश्वास ठेवू नका
महाबळेश्वर येथील रेजेंथा हॉटेलकडे जाणारा खासगी साकव पूल पावसामुळे बाधित झाला होता. तेथे अडकलेल्या सर्व पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. महाबळेश्वर–पाचगणी मुख्य रस्त्यावर कोणताही पूल कोसळलेला नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पाचगणीत महाकाय वृक्ष कोसळला
पाचगणीतील शॉपिंग सेंटर परिसरात हॉटेल फ्रेंड्स ट्रीट समोर उभा असलेला महाकाय सिल्व्हर ओक वृक्ष मुळासकट उन्मळून पडला. झाडाखाली उभ्या असलेल्या एक चारचाकी व एक दुचाकीचे मोठे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.
भिलार–दानवली मार्गावरील वाहतूक ठप्प
भिलार–दानवली मार्गावर महाकाय निलगिरीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी झाड हटवून वाहतूक पुन्हा सुरू केली.
कराडमध्ये खोडशी बंधारा ओव्हरफ्लो
मुसळधार पावसामुळे कराड येथील खोडशी बंधारा ओव्हरफ्लो झाला असून कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरडप्रवण गावाला प्रशासनाची भेट
पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी या दरडप्रवण गावाला प्रांताधिकारी सोपान टोम्पे व तहसीलदार अनंत गुरव यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, पूल, घाट परिसर आणि दरडप्रवण भागात जाणे टाळण्याचे तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.







0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!