'किसन वीर'चा
भविष्यकाळ उज्वलच :
खा. नितीनकाका पाटील
किसन वीर, किसन वीर-खंडाळा कारखान्यांचे मिल रोलर पूजन
वाई, प्रतिनिधी : किसन वीर साखर कारखान्याचे सभासद जवळपास ६५ हजार आहेत. प्रत्येक सभासदाने जर आपला १० टन ऊस कारखान्यास गाळपास दिला, तरी कारखान्याचे गाळप ६ लाख ५० हजार मेट्रिक टन होईल. अशा पद्धतीने ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण पिकविलेला ऊस जर कारखान्यास गाळपासाठी पाठविला तर कारखान्याचे गाळपाचे उद्दीष्ठ पुर्ण होण्यास कसलीही अडचण येणार नाही. गाळप उद्दीष्ठ पुर्ण झाल्यावर किसन वीर कारखान्याचा भविष्यकाळ कसा असेल हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची आवश्यकता भासणार नाही तो उज्वलच असणार, असा आत्मविश्वास सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्यांचा सन २०२६-२७ च्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहब सोळस्कर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, बावधन तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ , जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, एनसीडीसी बँकेने जे कर्जरुपी पैसे दिलेले आहेत ती रक्कम फक्त आणि फक्त बँकांचे कर्ज भागविण्याकरिताच वापरलेली आहे. खंडाळा कारखान्याच्या सर्व बँकांचे ओटीएस झालेले असून किसन वीर कारखान्याचे फक्त दोन बँकांचे ओटीएस बाकी आहे, तेही लवकरच होणार असल्याचेही सांगितले. दोन्ही कारखान्यांची सर्व कर्ज भागविल्यानंतर एक ते दीड वर्षात नेटवर्थ वाढल्यानंतर बँकांकडून नियमित कर्ज वाटप सुरू होईल. शेतकऱ्यांना आपले ऊस बील पंधरवडावाईज मिळण्यासाठी अजुन थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा एकही रूपाया बुडणार नाही, एवढा विश्वास मी माझ्या व्यवस्थापनाच्यावतीने देत असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना वाचविण्याचे काम राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व आम्ही करीत आहोत. चांगल्या प्रतीचा ऊस देण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे. किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखान्यांनी मागील हंगामामध्ये अनुक्रमे प्रतिदिन ५ हजार ते ५ हजार ५०० व ३ हजार ४०० मेट्रिक टनाने गाळप केलेले होते. परंत् मागील हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसाचे हेक्टरी उत्पादन घटलेले होते. गळित हंगाम २०२६-२७ मध्येही आपले दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालण्यासाठी आवश्यक असणारी तोडणी यंत्रणा भरण्यात आलेली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देऊन किसन वीर कारखान्याचा ७ लाख व खंडाळ्याचे ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दीष्ठ पुर्ण करण्यासाठी आपला संपुर्ण ऊस दोन्ही कारखान्यास घालावा, असे आवाहनही खासदार नितीनकाका पाटील यांनी केले.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, मागील चार सिझन आपण अनेक अडचणी पार पाडीत पारदर्शक कारभार करीत सर्व ऊस उत्पादकांची सर्व ऊस बीले वर्ग केलेली आहेत. तसेच मागील व्यवस्थापनाच्या काळातील २०२०-२१ मधील ६४ कोटींची बीले वर्ग केलेली आहेत. नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अनेक प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालेलो असून उर्वरित प्रश्नही लवकरच सोडविली जाणार असल्याचा विश्वासही यावेळी श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे संचालक बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, संचालक ज्ञानेश्वर भोसले, पंचायत समितीचे सभापती भैय्यासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव, सदस्य रमेश गायकवाड, पोपट जगताप, शशिकांत पवार, महादेव मस्कर, चरण गायकवाड, प्रा. डॉ. नितीन कदम, अरविंद कुदळे, सत्यजित वीर, पप्पु हगीर, बबनराव साबळे, अजय कदम, अरविंद कदम, ॲड. उदयसिंह पिसाळ, चरण गायकवाड, रामभाऊ शिंदे, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, प्रमोद वारागडे, राजेंद्र भोसले, सयाजी बाबर, रफीक फरास, शिवाजीराव बाबर, नारायण नलावडे, सुजित जाधवराव, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते
ज्यांचे संस्थेसाठी योगदान नाही,
अशांनी बोलू नये -: नितीनकाका पाटील
मागील काही दिवसांपासन एक महाशय किसन वीरबाबत सोशल मिडीयातून काहीतरी बरळत असून चांगल्या चाललेल्या संस्थेबाबत काहीतरी अपप्रचार करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, ज्यांनी या संस्थेत ऊसाचे एकही टिपरे घातलेले नाही, ती व्यक्ती आज संस्थेसाठी बोलत आहे. ज्यांचे संस्थेसाठी काहीही योगदान नाही, त्यांना संस्थेबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. सभासदांनीही अशा अपप्रवृत्तींचा थारा न देता कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!