विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; ऋतुजाताई शिंदे यांची तत्परता ठरली दिलासादायक; पिराचीवाडी-दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांच्या निधीची ग्वाही, ग्रामस्थांकडून कौतुक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य!

ऋतुजाताई शिंदे यांची 

तत्परता ठरली दिलासादायक

पिराचीवाडी-दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांच्या निधीची ग्वाही

ग्रामस्थांकडून कौतुक

संतोष शिराळे |सातारा

मुसळधार पावसामुळे पिराचीवाडी (दत्तनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील डोंगराचा उतार खचून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, बावधन जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक कामांसाठी १५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सततच्या पावसामुळे शाळेच्या संरक्षण भिंतीलगत मोठ्या प्रमाणात माती व दगड-गोटे साचल्याने धोका निर्माण झाला होता. दरड कोसळल्याने शाळेच्या शौचालयाचे आणि किचनशेडचेही नुकसान झाले असून, आणखी पाऊस झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती.

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ऋतुजाताई शिंदे आणि युवा नेते विराज भैय्या शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संरक्षण भिंतीसाठी ९ लाख रुपये, शौचालय दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये आणि शाळा व किचनशेडच्या पत्र्यांसाठी ३ लाख रुपये असा एकूण १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच संबंधित कामे युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शाळेची तात्पुरती व्यवस्था मंदिरामध्ये करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शिक्षण या दोन्ही बाबींचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावेळी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, अभियंता केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर, ग्रामसेविका धायगुडे मॅडम, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

वेळेवर घटनास्थळी भेट, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील भूमिका, निधी उपलब्ध करून देण्याची तत्परता आणि तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश यामुळे ग्रामस्थांनी ऋतुजाताई शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकप्रतिनिधींनी दाखविलेली ही संवेदनशीलता सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments