फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून
नाव वगळले जाण्याची शक्यता
SIR फॉर्म भरण्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांचे आवाहन
29 जुलैपर्यंत मुदत वाढ
संतोष शिराळे |सातारा
मतदार यादी शंभर टक्के अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सघन मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत प्रत्येक नोंदणीकृत मतदाराने SIR गणना फॉर्म भरणे बंधनकारक असून, फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तातडीने फॉर्म भरावा, असे आवाहन सातारा नगरपरिषदेचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन 'एन्युमरेशन फॉर्म'चे वितरण व संकलन करणार आहेत. तसेच विविध ठिकाणी विशेष शिबिरेही आयोजित करण्यात आली आहेत.
SIR मोहीम का राबवली जात आहे?
भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मृत मतदारांची नावे वगळणे, दुबार नोंदी हटविणे, पत्ता बदललेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे, नव्याने 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांची नोंद करणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे यावर भर दिला जाणार आहे.
फॉर्ममध्ये कोणती माहिती भरावी?
SIR फॉर्ममध्ये मतदाराचे नाव (मराठी व इंग्रजी), जन्मतारीख किंवा वय, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक (ऐच्छिक), कुटुंबातील सदस्यांचा तपशील तसेच छायाचित्र पडताळणीसाठी आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
फॉर्म भरताना आधार कार्ड (ऐच्छिक), मतदान ओळखपत्र (EPIC), राहण्याचा पुरावा, जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा आणि अलीकडील छायाचित्र आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन सुविधाही उपलब्ध
मतदार सेवा पोर्टल तसेच Voter Helpline मोबाईल ॲपद्वारेही माहिती अद्ययावत करता येणार आहे. तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
तीन वेळा भेट, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास नोटीस
प्रशासनाच्या माहितीनुसार, BLO संबंधित मतदाराच्या घरी तीन वेळा भेट देणार आहेत. तरीही मतदार उपलब्ध न झाल्यास किंवा फॉर्म भरला गेला नाही तर संबंधित मतदाराला नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार गमवावा लागू शकतो.
सर्व मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन
सातारा जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मतदारांनी ही राष्ट्रीय मोहीम समजून वेळेत SIR फॉर्म भरावा आणि मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!