महू धरणावर ‘झिंग झिंग झिंगाट’
तळीरामांचा अड्डा अन् दारूच्या बाटल्यांचा खच!
पाचगणी : निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महू धरण परिसरात सध्या मद्यप्रेमींचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि इतर घाण साचल्याने पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, वहागाव ग्रामपंचायतीने धरण परिसरात मद्यपानास बंदी घातली असूनही या आदेशाला सर्रास केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांसह परिसरातील काही तळीरामांकडून धरण परिसराचा मद्यपानासाठी वापर होत असल्याची चर्चा आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सुट्टीच्या दिवशी आणि सायंकाळच्या वेळेत धरण परिसरात तरुणांच्या टोळक्यांची गर्दी वाढते. मद्यपानानंतर रिकाम्या बाटल्या आणि कचरा तेथेच टाकला जात असल्याने परिसराचे सौंदर्य विद्रूप होत आहे. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच साचलेला दिसून येत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, धरण परिसरात किंवा आजूबाजूच्या भागात काही ठिकाणी अवैधरित्या मद्य उपलब्ध होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे बंदी असूनही मद्यपानाचे प्रकार वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत संबंधित प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
महू धरण हे कुटुंबांसह पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांचे आकर्षण केंद्र मानले जाते. मात्र मद्यपान करणाऱ्यांच्या वाढत्या वावरामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीय पर्यटकांना अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याची तक्रारही पुढे येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी धरण परिसरात नियमित गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, कडक दंडात्मक कारवाई आणि अवैध मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यटकांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून परिसर स्वच्छ राखावा आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महू धरण परिसराचा निसर्ग आणि पर्यटनाचे महत्त्व जपायचे असेल, तर प्रशासन, ग्रामपंचायत आणि नागरिक यांनी संयुक्तपणे पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!