रस्त्यावर तोंड धुण्यास विरोध केल्याने ठाण्यात परप्रांतीय चालकाची वृद्धाला मारहाण


रस्त्यावर तोंड धुण्यास विरोध

केल्याने ठाण्यात परप्रांतीय

चालकाची वृद्धाला मारहाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

ठाणे पोलीस आयुक्तांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश 

ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर एका वयोवृद्ध नागरिकाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाविरोधात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर तोंड धुण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली. मारहाणीमुळे वृद्ध नागरिक जमिनीवर कोसळले, तरीही संबंधित चालक शिवीगाळ करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणेकरांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, राजकीय मतभेद बाजूला ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले. शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे आणि शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे यांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपी चालकाचा शोध घेत त्याला पकडले. त्यानंतर आरोपीला वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देत त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. वरिष्ठ नागरिकांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते.

या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments